गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीवरुन संताप व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्रामध्ये होत असलेली वृक्ष लागवड हे केवळ एक नाटक आहे’, असं सयाजी शिंदे म्हणाले आहेत. इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये ५ कोटी वृक्ष लागवडीची जी मोहिम आहे तीच मुळात थोतांड असून हे करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचं कुरण आहे, असंही ते म्हणाले.
”राज्य सरकारने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला असून यामध्ये ३३ कोटी वृक्ष लावण्याचं लक्ष्य सरकारचं आहे. तसा निर्धारदेखील राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मात्र राज्य सरकारची ही वृक्ष लागवड योजना केवळ दाखविण्यापुरती आहे”, असं ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणत सयाजी शिंदे यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
पुढे ते म्हणतात, “आपल्याकडे जवळपास २५० जातीची झाडं उपलब्ध असून अनेक शाळांच्या अंगणामध्ये मोठ-मोठी वृक्ष पाहायला मिळतात. मात्र दरवर्षी त्याच खड्ड्यांमध्ये जाऊन झाडे लावली जातात. इतकंच नाही तर ३३ कोटींचा टप्पा पार करण्यासाठी सरकार कोणतेही झाडं जाऊन लावत आहेत. माझ्याकडे २३ ठिकाणी १२ जिल्ह्यांमध्ये वृक्ष लागवडीचं काम सुरु आहे. मात्र मी कधीही त्याचं शुटींग केलं नाही. किंवा ते सगळ्यांना दाखवलंही नाही. मी जी झाडं लावतोय त्यांची संख्या येत्या काळात आणखी वाढेल. झाडे लावतांना कोणत्या ठिकाणी कोणतं झाड लावावं यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ मंडळी आहेत”.
दरम्यान, हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम जगजाहीर आहे. सयाजी शिंदे गेल्या काही वर्षांपासून वृक्ष लागवड करत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी ‘ट्री स्टोरी’ फाउंडेशन स्थापन केले असून, त्या माध्यमातून वृक्षप्रेमींना संघटित करून त्यांच्याद्वारे वृक्षारोपण व वृक्षसंगोपनाचे काम हाती घेतले आहे.