श्रीरामपूर : व्यसनी मुलाने आईचा खून केला. नंतर आईचे निधन झाल्याचे निरोप नातेवाइकांना दिले. अंत्यविधींची तयारी सुरू  झाली. पण अंघोळीच्या वेळी प्रकार लक्षात आल्याने पोलिसांना कळविण्यात आले. खून करणाऱ्या राजेंद्र गोविंद लांडे (वय ४५) याला पोलिसांनी अटक केली. तांभेरे (ता. राहुरी) येथे ही घटना घडली.

तांभेरे गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर तळवाडे ही वस्ती आहे. तेथे राजेंद्र गोविंद लांडे हा आई इंदूबाई (वय ७०) हिच्यासह राहतो. तो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. त्याची पत्नीही त्याला सोडून माहेरी गेली आहे. काल बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आई इंदूबाई हिचा खून केला. नंतर मृतदेह घरात खोलीत आणून ठेवला. आईच्या निधनाची बातमी नातेवाइकांना कळविली.

आज सकाळी पन्नास ते साठ नातेवाईक अंत्यविधीसाठी जमा झाले. मयत इंदूबाई हिचा मृतदेह अंघोळीसाठी बाहेर काढण्यात आला. त्या वेळी इंदूबाईच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. इंदूबाईचा दुसरा मुलगा दिगंबर हा पुणे येथे राहतो, तो अंत्यविधीसाठी आला होता. त्याने हा प्रकार पोलिसांना कळविला.

अंत्यविधीच्या ठिकाणी राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आरोपी राजेंद्र लांडे यास अटक केली. राजेंद्रने आईच्या डोक्यात, पोटावर फुकणीच्या साहाय्याने मारहाण केली होती. त्यात इंदुबाई लांडे यांचे जागीच निधन झाले. अशी कबुली त्याने पोलिसांपुढे दिली. राहुरी पोलीस ठाण्यात दिगबर लांडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र लांडे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.