Aditi Tatkare on Aparna Mahadik Death in ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानाने अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे विमान कोसळले. या दुर्घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटना झालेल्या विमानात २४२ जण प्रवास करत होते, ज्यापैकी २३० हे प्रवासी, दोन वैमानिक आणि १० क्रू मेंबर्स होते. यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे तर एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. बचावलेला व्यक्ती हा मूळ भारतीय असलेला ब्रिटीश नागरिक आहे. दरम्यान या अपघातात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या आत्ये वहिनी अपर्णा महाडिक यांचे देखील निधन झाले आहे. अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक भावनिक पोस्ट केली आहे.
आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
अदिती तटकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अपघाताच्या काही दिवस आधी त्यांच्या वहिनींशी झालेल्या भेटीबद्दल माहिती दिली आहे. “आमच्या कुटुंबातील सदस्य, माझ्या आत्ये वहिनी तथा एअर इंडियाच्या वरिष्ठ क्रू मेंबर सुपरवायझर अपर्णा महाडिक यांचे अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. अवघ्या काही दिवसांपूर्वी आम्ही सगळे कुटुंबिय भेटलो होतो, त्यावेळी आयुष्याच्या अनिश्चिततेवरही आम्ही बोललो. ही अनिश्चितता काही दिवसांतच आमच्या कुटुंबाला अनुभवावी लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते,” असे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
आमच्या कुटुंबातील सदस्य, माझ्या आत्ये वहिनी तथा एअर इंडियाच्या वरिष्ठ क्रू मेंबर सुपरवायझर अपर्णा महाडिक यांचे अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले.
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) June 14, 2025
अवघ्या काही दिवसांपूर्वी आम्ही सगळे कुटुंबीय भेटलो होतो, त्यावेळी आयुष्याच्या अनिश्चिततेवरही आम्ही बोललो. ही… pic.twitter.com/SUvsBDs6Em
“कर्तव्यपरायणता, विनम्रता आणि आत्मीयता ही अपर्णा वहिनींच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबातील एक मनमिळाऊ सदस्य, आणि समाजातील एक स्वावलंबी, कर्तबगार स्त्री काळाच्या पडद्याआड गेली आहे,” अशी भावनाही आदिती तटकरे यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.
“या अपार दुःखाच्या प्रसंगी आमच्या आत्या सौ. सुलभा महाडिक, काका यशवंत महाडिक, आतेभाऊ अमोल महाडिक व त्यांची चिमुकली मुलगी अमायरा, तसेच अपर्णा वहिनींच्या आई व बहीण यांच्या सोबत आम्ही संपूर्ण कुटुंब ठामपणे उभे आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” असेही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अनेकेत तटकरे यांची पोस्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी देखील सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. “आमच्या कुटुंबातील एक हसते-खेळते व्यक्तिमत्त्व, यशस्वी, आत्मनिर्भर, कष्टाळू तसेच कुटुंबवत्सल अशा आमच्या अपर्णा वहिनी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत आमच्यातून निघून गेल्या. दोन दिवस झाले तरी अजूनही यावर आमचा विश्वास बसत नाही.
आमच्या आत्या व काका, सुलभा आणि यशवंत महाडिक, माझा भाऊ अमोल महाडिक आणि त्यांची छोटीशी लेक अमायरा यांचं जग या दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले आहे.
एअर इंडिया मधील वरिष्ठ क्रू सदस्य असलेली आमची वहिनी अपर्णा महाडिक यांच्यासह आम्ही सर्व भावंडं मंडळी काही दिवसांपूर्वीच भेटलो होतो. आणि आज काही दिवसांतच त्या आमच्यात नाही, यामुळे जीवन किती अनिश्चित आहे, याची प्रचिती प्रकर्षाने जाणवत आहे.
आमच्या कुटुंबातील एक चैतन्याचा झरा, मनमिळावू व्यक्तिमत्त्व, उत्तम आई, यशस्वी स्त्री असलेल्या अपर्णा वहिनी, त्यांची उणीव कधीच भरून निघणार नाही.
आमच्या सगळ्यांसाठी लहानगी अमायरा आता एका नव्या जबाबदारीसारखी आहे. तिच्यावर अपर्णा वहिनींचं जीवापाड प्रेम होतं. त्यांची कमी आम्ही कधीच भरुन काढू शकणार नाही, मात्र मायेची ऊब आणि सावली अमायराला कायमच देत राहू. अपर्णा वहिनींना चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!”