Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana August Month Installment : महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांसाठी सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता सप्टेंबर महिना सुरू होऊन जवळपास १० दिवस झाले तरीही अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं.
दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? या विषयीची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून (११ सप्टेंबर) वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती!, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.”
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 11, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली… pic.twitter.com/oRnOcQxuzP
लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का?
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, त्यानंतर लाडक्या बहिणींना १५०० रुपये ऐवजी २१०० कधीपासून देण्यात येणार? यावर अद्याप तरी सरकारकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला होता. तेव्हा आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की, “याबाबत आम्ही आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिलेलं आहे. नवीन अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार करण्यात येईल. मात्र, सध्या तरी लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचा लाभ आपण देणार आहोत”, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली होती.