शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे तसेच जवळपास ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. शिवसेनेतही दोन गट पडले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. “जे आपल्याला सोडून बंड पुकारून गेले आहेत, त्यांना काय मिळणार आहे. जे आज गुवाहाटीमध्ये गेले आहेत तिथे दोन चित्र दिसत आहेत. दोन शूरवीर परत निघून आले आहेत. काही मंडळी केंद्रसकारला घाबरून गेले आहेत. आता घाण निघून गेली. जे काही व्हायचंय ते चांगलंच होणार,” असे म्हणत बंडखोर आमदारांसाठी परतीचे दोर कापल्याचे संकेत विश्वास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. ते मुंबईत शिवसेनेच्या पादाधिकारी मेळाव्यामध्ये बोलत होते.

हेही वाचा >>> “…तर उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते,” शिवसेनेतील बंडाळीनंतर संजय राऊतांची महत्त्वाची माहिती

“काही आमदार प्राईस टॅग लावून गेले आहेत, ते आपले नव्हते आणि कधी होणारही नाहीत. अमाप पैसा ओतला जातोय. आठ ते नऊ लाख प्रत्येक दिवशीचं त्यांच्या जेवणाचं बील आहे. पूर्ण हॉटेल बूक झाल्याचं मी ऐकलं आहे. तिकडे लाखो लोक पूरस्थितीत बुडत आहेत. ज्या राज्यात पूर आलेला आहे, लाखो लोक संकटात आहेत तिथे असं करायचं? आपलं पुढचं प्रत्येक पाऊल लढ्याचं असणार आहे,” असेदेखील आदित्य ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधून म्हणाले.

हेही वाचा >>> “तुमच्यावर ईडीचा दबाव आहे का?”; पत्रकारांच्या प्रश्नावर बंडखोर आमदार म्हणाले, “२-३ आमदारांवर…”

तसेच पुढे बोलताना त्यांनी बंडखोर आमदारांना लक्ष्य करत त्यांना पक्षात परत घेतले जाणार नसल्याचे सूतोवाच केले. “बंडखोर आमदारांपुढे एकच पर्याय आहे. एक तर प्रहार पक्षात जा किंवा भाजपात जा. प्रत्येक ठिकाणी आपले उमेदवार तयार असून ते जिंकायला तयार आहेत. शिवसेनेसोबत लढायचं असेल तर या. तिकडून प्रत्येकाने एकदा राजीनामा पाठवा आणि निवडणूक लढवा. आम्ही तयार आहोत. काही आमदार आपल्याला मेसेज पाठवत आहेत, त्या आमदारांना आपण परत घेऊ शकतो. पण जे दगाबाज आहेत त्यांना महाराष्ट्रात पुन्हा येऊ द्यायचे नाही; ही शपथ घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> “हा तर गोडसेच्या तोंडी महात्मा गांधींचा जयजयकार करण्याचा प्रकार,” राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या नवनीत राणांना अमोल मिटकरींचे सडेतोड उत्तर

तसेच, “दगाफटका खूप झालं. आपण त्यांना मान सम्नान दिला. मात्र तिकडे त्यांना कैदी असल्यासारखे वागवले जात आहे. लोकशाही अशी चिरडली जात असेल तर आपण मतदार म्हणून काय करणार? आपल्यासमोर आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातोय. पण न घाबरता त्यांना महाराष्ट्रातून पळवून लावायचं आहे,” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना निवडणुकांसाठी लढण्यास तयार राहण्याचे आवाहन केले.