Aditya Thackeray on Kabutar Khana & Devendra Fadnavis : मुंबईमधील दादर येथील कबुतरखाना बंद करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईवरून जैन समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. या कारवाईमुळे जैन समाज भाजपावर नाराज आहे. विकासकांच्या दबावाखाली राज्य सरकारने असा निर्णय घेतल्याचा आरोप जैन नागरिक करू लागले आहेत. दरम्यान, जैन समाजाच्या दबावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रश्न सोडवण्यासाठी आज (५ ऑगस्ट) संबंधित लोकांची बैठक बोलावली होती. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोवर येथील कबूतरांना कंट्रोल्ड फीडिंग करावं (नियंत्रित खाद्यपुरवठा) असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे. दरम्यान, फडणवीसांचा हा सल्ला ऐकून शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “कबूतरांना तिथे ठेवायचं असेल, स्थानिकांचीही तशी भावना असेल तर त्यांना तिथेच ठेवा. परंतु, काहीजण म्हणत आहेत की या कबुतरांना आरे कॉलनीत हलवता येईल. परंतु, ते शक्य नाही. त्यापेक्षा पालिकेच्या निर्णयाला विरोध करणारे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचा एखादा भूखंड या कबूतरांसाठी द्यावा. लोढा नावाचे मंत्री की लोढा नावाचे बांधकाम व्यावसायिक वरळी सी-फेस येथे मोठा बंगला बांधत आहेत. त्यांनी त्यांची थोडीशी जागा या कबूतरांना द्यावी.
…तर लोढांनी कबूतरांसाठी स्वतःचा भूखंड द्यावा : आदित्य ठाकरे
दरम्यान, काही स्थानिकांनी या कबूतरांना विरोध केला आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मराठी जैन, गुजराती जैन आणि मराठी बांधवांच्या या कबूतरांबाबत तीव्र भावना आहेत. प्रत्येकाचे आपापले अनुभव असतात. कोणाला श्वसनाचा त्रास आहे. कबूतरांना टाकलेल्या खाद्यामुळे काहीजण पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सर्वांच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे. मुंबईचे पालकमंत्री लोढा हे केवळ समाजमाध्यमांवर पत्र लिहितायत. हा अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. त्यापेक्षा त्यांनी सर्वांची बैठक घ्यावी, चर्चा करून मार्ग काढावा. ते देखील शक्य नसेल तर लोढा यांनी कबूतरांसाठी स्वतःचा भूखंड द्यावा.”
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूतरप्रेमींना सल्ला दिला आहे की सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोवर त्यांनी कबूतरांना कंट्रोल्ड फीडिंग करावं. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “कंट्रोल फीडिंग करायला ते काय एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत.”