लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रसारमाध्यमांमधील पेड न्यूज आणि जाहिरातींवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आज प्रसारमाध्यमे व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली.
प्रसारमाध्यमांमधील संभाव्य अनुचित प्रकारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने कठोर र्निबध घातल्याचे कवडे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालीच त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची बैठक बुधवारी झाली. त्यानंतर कवडे म्हणाले, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना दिल्या जाणाऱ्या जाहिराती प्रमाणित करून घ्याव्या लागणार असून, ही काळजी राजकीय पक्ष व उमेदवारांनाच घ्यावी लागेल. तीन दिवस आधी विहित नमुन्यातील अर्ज दाखल करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. वर्तमानपत्रांमधील प्रचारकी थाटाच्या बातम्यांचेही तर्पण होणार आहे. तक्रार आल्यानंतरच त्याची दखल घेतली जाईल असे नाहीतर अशा गोष्टींची ही समितीच दखल घेणार आहे. राजकीय पक्ष किंवा उमेदवारांचा प्रचार केवळ जाहिरातीतूनच झाला पाहिजे, बातम्यांमधून तो होऊ नये अशाच निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत असे कवडे यांनी सांगितले.
जिल्हय़ातील मतदार नोंदणी व तत्सम कामाचीही माहिती कवडे यांनी दिली. ते म्हणाले, जिल्हय़ात १६ लाख ४६ हजार ९०३ पुरुष आणि १४ लाख ७२ हजार ७९७ महिला असे एकूण ३१ लाख १९ हजार ७८१ मतदार आहेत. मतदारांच्या छायाचित्रांचे काम जिल्हय़ात उत्तम प्रकारे झाले असून ९८ टक्के मतदारांची छायाचित्रे मतदारयादीत समाविष्ट आहेत. राज्याच्या पातळीवरही हे काम आघाडीवर आहे, मात्र येत्या काळात राहिलेल्या मतदारांचीही छायाचित्रे पूर्ण करण्यात येणार असून हे काम शंभर टक्के व्हावे असाच प्रयत्न आहे असे कवडे यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी, नगरचे प्रांत राजेंद्र पाटील, समितीचे सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, सदस्य महादेव कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
११ ‘अदर जेंडर’ मतदार
निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच तृतीयपंथीयांना मतदारयादीत स्वतंत्र स्थान दिले आहे. त्यासाठी ‘अदर जेंडर’ असा स्वतंत्र रकाना आहे. त्याअंतर्गत जिल्हय़ात ११ मतदारांची नोंद झाल्याची माहिती या वेळी देण्यात आली. ते सर्व नगर शहरातील आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘पेड न्यूज’वर प्रशासनाची करडी नजर
लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रसारमाध्यमांमधील पेड न्यूज आणि जाहिरातींवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आज प्रसारमाध्यमे व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली.

First published on: 27-02-2014 at 02:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Administration attention on the paid news