जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने अटक केल्याच्या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष अद्वय हिरे यांनी केलेले आरोप निषेधार्ह असून वडिलोपाíजत शिक्षण संस्थांच्या नावाखाली स्वत:चा विकास करताना आपल्या शिक्षण संस्थेतील किती कुटुंबांकडून त्यांनी आर्थिक व्यवहार केले याचे आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन आ. जयंत जाधव यांनी केले आहेत.
वर्षांनुवर्षे सत्तास्थाने मिळून समाजासाठी काय केले, याचे प्रथम हिरे यांनी आत्मपरीक्षण करावे. जनतेने त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातून हद्दपार केल्यानंतर केवळ पैशांच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. मतदारांनी या कुटुंबाला राजकारणातून हद्दपार केल्याने केवळ पूर्वजांच्या पैशाच्या जोरावर त्यांचे राजकारण सुरू आहे. त्यांच्या चेअरमनपदाच्या काळात कधी नव्हे एवढे भ्रष्टाचार व गैरव्यवहार जिल्हा बँकेत घडत आहेत. ज्या हिरे घराण्याकडे वर्षांनुवर्षे सत्ता राहिली त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा साधा रस्त्याचा अथवा पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही, याकडेही आ. जाधव यांनी लक्ष वेधले आहे. मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. त्यामुळे आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून सार्वजनिक जीवनातून हद्दपार होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हिंमत असेल तर त्यांनी सार्वजनिक निवडणुकीतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.