महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना संचालनालयाच्या वायुदल शाखेतील एअरो मॉडेलिंग इन्स्ट्रक्टर पदावर काम करणाऱ्यांची स्थिती ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली असून, त्यांच्यासाठी नियमित पदोन्नतीची वा अतिरिक्त वेतनवाढीची कोणतीही तरतूद नाही. भविष्यात एअरो मॉडेलिंग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी  हे क्षेत्र फारसे सुखावह ठरणार नसल्याचेच चित्र तूर्त निर्माण झाले आहे. हवाई संरक्षण आणि वैमानिकांच्या प्रशिक्षणाचा पाया घडविणारे इन्स्ट्रक्टर्स उपेक्षित आहेत.
महाराष्ट्रात राष्ट्रीय छात्रसेना संचालनालयाच्या एअर विंग शाखेचे क्रमांक १ महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रन एन.सी.सी. एअर विंग, मुंबई, क्रमांक २ महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रन एनसीसी एअरविंग, नागपूर आणि क्रमांक ३ महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रन एनसीसी एअरविंग, पुणे असे तीन युनिट समाविष्ट करण्यात आले आहेत. या युनिट्समध्ये एअरो मॉडेलिंग इन्स्ट्रक्टरची तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. ही पदे क्रीडा व युवक कल्याण संचालनालयाच्या अखत्यारीत येतात. या पदांवर कार्यरत एअरो मॉडेलिंग इन्स्ट्रक्टरच्या कार्याचे मूल्यमापन समादेशक अधिकारी व उपसंचालक एन.सी.सी. महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार केले जाते. लढाऊ वैमानिक किंवा प्रवासी विमानांचे वैमानिक अगदी प्रारंभीच्या काळात एअरो मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेऊन पुढील प्रशिक्षणाची तयारी करतात. अशाच प्रशिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय छात्रसेनेने देशाला जिगरबाज लढाऊ वैमानिक दिलेले आहेत.
नवी दिल्लीत दरवर्षी २६ जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या प्रमुख सोहळ्यात छात्रसेनेच्या वायुदल शाखेचे छात्रसैनिक रिमोट कंट्रोल विमानांचे अप्रतिम प्रदर्शन घडवून आपापल्या राज्याला पदके मिळवून देत असून, यात महाराष्ट्रातील छात्रसैनिक आघाडीवर आहेत. या छात्रसैनिकांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी एअरो मॉडेलिंग इन्स्ट्रक्टर्सवर वर्षभर सोपविली जाते. परंतु, त्यांना अतिरिक्त वेतनवाढ वा अन्य आर्थिक लाभ तसेच पदोन्नती देण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. विमान प्रतिकृती प्रशिक्षकाचे पद सातत्याने उपेक्षित राहिले आहे.
आजवर हजारो छात्रसैनिकांनी भारतीय वायुदलात प्रवेश मिळवून अतुलनीय कामगिरी केली आहे. असे छात्रसैनिक घडविण्यात एअरो मॉडेलिंग इन्स्ट्रक्टर्सचेही मोलाचे योगदान राहिले आहे.
देशभरातील विविध राज्यांमध्ये एनसीसी एअर विंगमध्ये विमान प्रतिकृती प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रशिक्षकांचे कार्य व जबाबदारी सारखीच असली तरी वेतनश्रेणीमध्ये प्रचंड असमानता आहे. आंध्र प्रदेशात वरिष्ठ प्रशिक्षक हे पद प्रथमश्रेणी प्रशिक्षक अधिकारी म्हणून दिलेले आहे, तर तेथील कनिष्ठ प्रशिक्षकाचे पद द्वितीय श्रेणीत येते. महाराष्ट्रात मात्र हे पद तृतीय श्रेणीत टाकण्यात आले असून, कोणतीही पदोन्नती दिली जात नाही. विमान नमुना प्रशिक्षक हे पद राज्य शासकीय कर्मचाऱ्याचेच असून त्यांच्या कार्यासाठी मात्र कोणत्याही पुरस्कारांची शिफारस वा दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे असे शासकीय पुरस्कार मिळण्यापासून सदर प्रशिक्षक दूर राहिलेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्त्वाची जबाबदारी
छात्रसैनिकांना छोटेखानी विमान उडविण्याचे प्रशिक्षण देणे हे मुख्य काम विमान नमुना प्रशिक्षकांना देण्यात आले आहे. एनसीसीच्या अखिल भारतीय स्पर्धामध्ये रिमोट कंट्रोल एअरो मॉडेल्सचा १९८२ पासून समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षणासाठी किमान एक वर्षांचा दीर्घ कालावधी लागतो. ही विमाने ताशी ९० ते १०० किमी वेगाने उडतात. प्रशिक्षणार्थीच्या हातून चूक घडल्यास ती घातक ठरू शकते. त्यामुळे ही प्रशिक्षणाची महत्त्वाची जबाबदारी विमान नमुना प्रशिक्षक पार पाडत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aero modeling instructor niether has additional payment nor any provision of growth in promotion
First published on: 23-05-2013 at 01:53 IST