राहाता : लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला पण त्यानंतर संगमनेर व पारनेरला दिलेला जोरदार झटका शेवटपर्यंत कायम विरोधकांच्या लक्षात राहील. आता श्रीरामपूरसाठी थोडे थांबा, लक्ष घालतो, असा इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांना दिला.

दत्तनगर गावठाण येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मंजूर केलेल्या घरकुलांच्या बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी डॉ. विखे बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दीपक पटारे, नानासाहेब शिंदे, शरद नवले, गणेश गुदगुले, अभिषेक खंडागळे, सुरेंद्र थोरात, संगीता शिंदे, सरिता कुंकलोळ, नानासाहेब पवार, प्रेमचंद कुंकलोळ, भीमा बागुल आदी उपस्थित होते.

राजकारण छोट्या गोष्टींवर न करता ते गरिबांना घर, शेतकऱ्यांना वीज आणि शिक्षणावर झाले पाहिजे. श्रीरामपूर बदलायचे असेल तर तुझं माझं सोडून जनतेच्या हितासाठी काम करावे लागेल, असे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. सत्ता बदलली की काही नेते पक्ष बदलतात. मात्र, गोरगरीब जनतेची सेवा केली तर जनता कधीच विसरत नाही. त्यामुळे जनतेवर विश्वास ठेवावा, पुढाऱ्यांवर नव्हे असे ते म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेत श्रीरामपूरमध्ये ६०० नवीन घरकुल मंजूर झाली. ही घरे सोलर स्टीमसह उभारण्यात येणार आहेत. यासाठी दत्तनगर हे एकत्रित केंद्र असणार आहे.

श्रीरामपूर शहरातील वाढती गुन्हेगारी, चेन स्नॅचिंग, खंडणी व महिला अत्याचाराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. गुन्हेगारी प्रवृत्तीला समर्थन देणार नाही. अशांना उखडून फेकले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी डॉ. विखे यांनी गावच्या विकासासाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आणि हक्कासाठी सजग राहण्याचे आवाहन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पदामुळे माणूस मोठा नाही

कामे केली तर जनता आपल्याला नेता बनवते. त्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नसते. श्रीरामपूरसाठी ही सुरुवात आहे. आता मी इथे सातत्याने येणार आहे. ही केवळ सुरुवात आहे. सर्वांनी एकत्र येऊन विकासात्मक दृष्टीने काम करू, असेही डॉ. सुजय विखे म्हणाले.