पुढील वर्षी होणा-या कुंभमेळ्यासाठी पाण्याच्या आरक्षणाच्या नावाखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आतापासूनच गोदावरी कालव्यांचे हक्काचे पाणी अडवून आम्हाला उद्ध्वस्त करणार असतील तर कार्यकर्त्यांसह पक्ष बदलण्याचा विचार करावाच लागेल, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी मंगळवारी दिला.
गोदावरी कालवे पाटपाणी संघर्ष समितीच्या वतीने पाण्याच्या प्रश्नावर संजीवनी कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हे होते. संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव सरोदे, संजीवनी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, पक्षाचे शहराध्यक्ष दिलीप दारुणकर, गणेशचे संचालक धनंजय जाधव, संजीवनीचे उपाध्यक्ष साईनाथ रोहमारे, अरविंद ससाणे आदी या वेळी उपस्थित होते.
शंकरराव कोल्हे म्हणाले, कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र किकवी धरण बांधावे म्हणून गेल्या पाच वर्षांपासून शासनदरबारी मागणी करीत आहे. सिंहस्थ निधीतून हे धरण मार्गी लागू शकते. मात्र तसे न करता आमच्याच पाण्यातून कुंभमेळ्याची व्यवस्था केली जात आहे. शेती आणि पिण्यासाठी पाणी मिळवायचे असेल तर राज्य सराकारवर दबाव निर्माण करण्यासाठी रास्ता रोको, जेल भरो आदी मार्गाने आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. पाण्यावाचून येथील माणसे मरणार असतील तर कुंभमेळा करणार का, तुटीच्या ऊर्ध्व गोदावरी खो-यात पाणी वाढविण्याऐवजी राज्य सरकार तुटीच्याच पाण्याचे वाटप करीत आहे हे बरोबर आहे काय, असे सवालही कोल्हे यांनी केले.   
बिपीन कोल्हे म्हणाले, ३५ वर्षांत कोल्हेंनी काय केले यापेक्षा गेल्या १० वर्षांत येथील लोकप्रतिनिधीने नव्याने कोणतेच प्रयत्न केले नाही, हे महत्त्वाचे आहे. आम्ही पाणी मिळविण्यासाठी स्वकीयांसह नाशिक-मराठवाडय़ाविरुध्दही संघर्ष करतो. वेळप्रसंगी रस्त्यावर येऊन आंदोलने करतो, मात्र लोकप्रतिनिधी फक्त कपोलकल्पित बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करतात, असा आरोप त्यांनी केला.
 चारही बाजूने अडवणूक
तालुक्यात येणारे पालखेडचे पाणी मंत्री छगन भुजबळ अडवतात, निळवंडय़ाचे पाणी राधाकृष्ण विखे, मधुकर पिचड, बाळासाहेब थोरात हे तीन मंत्री अडवतात. आता मराठवाडय़ातील सर्वपक्षीय आमदारही आमचे पाणी पळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत आमचे आमदार अशोक काळे झोपले असताना आम्ही कुणा, कुणाशी भांडायचे असा उद्विग्न सवाल माजी मंत्री कोल्हे यांनी केला.