जिल्ह्य़ातील भंडादरा व मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रविवारी आश्वी येथे आक्रमकपणे रस्त्यावर येऊन कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावरील लोखंडी फळ्या काढण्यासाठी आलेल्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले.
गोदावरी पाटबंधारे महामंडळाने भंडारदारा धरणाचे पाणी मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजाच धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. आश्वी येथील प्रवरा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावरील लोखंडी फळ्या काढण्यासाठी जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता एस. आर. गणेश व अन्य कर्मचारी आल्याचे समजताच परिसरातील ५०० ते ६०० शेतकऱ्यांनी बंधाऱ्यांकडे धाव घेतली व फळ्या काढण्यास विरोध केला. शेतकरी अचानक आक्रमक झाल्याने जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी गोंधळून गेले. या शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संतापलेल्या शेतकऱ्यांचा आक्रमकता पाहून जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना या बंधाऱ्यावरील प्लेट काढता आल्या नाही. शेतकऱ्यांनी त्यांना पिटाळून लावले.
दरम्यान सोमवारी कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावरील लोखंडी दरवाजे काढण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले असून यालाही विरोध करण्यासाठी शेतकरी सज्ज आहेत. कुठल्याही परिस्थितीत बंधाऱ्यांच्या फळ्या काढू न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. जि. प.चे माजी सदस्य आण्णासाहेब भोसले, माधवराव गायकवाड, विनायक बालोटे, विजय चतुरे, देविचंद तांबे, बाळासाहेब मांढरे, नवनाथ ताजणे, सुभाष चतुरे आदी यावेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation for jayakwadi water
First published on: 08-12-2014 at 02:30 IST