मोहनीराज लहाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या ३१ मे रोजी चौंडी (ता. जामखेड) येथे होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी  स्वतंत्र कार्यक्रमासाठी मागितलेली परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाने नाकारली आहे. त्यामुळे रोहित पवार काय भूमिका घेतात, याकडे पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. तसेच चौंडीमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चौंडी हे अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव. आता हे गाव संघर्षांचे ठिकाण बनले आहे. गेल्या वर्षी जयंती दिनीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर एकाच वेळी तेथे आल्याने राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. मागील वर्षी जयंतीच्या दिवशी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात होते. त्या वेळी जिल्हा प्रशासनाने भाजप आमदार पडळकर यांना चापडगाव रस्त्यावरच रोखले होते. शरद पवार यांची सभा झाल्यानंतरच त्यांना चौंडीत प्रवेश देण्यात आला होता.

आता राज्यात सत्ताबदल झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने अहिल्यादेवी होळकर यांची सरकारी जयंती करण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी यंदा जिल्हा नियोजन समितीकडून ५० लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. चौंडीमध्येच शोभायात्रा आयोजित करून जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी परवानगी मागितली होती. चौंडीमध्येच राज्य सरकारकडूनच जयंती साजरी केली जात असल्याने  पवार यांच्या स्वतंत्र जयंती कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ahilya devi jayanti chaundi rohit pawar program denied permission ysh
First published on: 25-05-2023 at 01:15 IST