अहिल्यानगर: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या ९२ हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली. यातील जामखेड, पारनेर, कोपरगाव, श्रीगोंद्यातील २३ हरकती मान्य करण्यात आल्या उर्वरित ६९ हरकती फेटाळण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती उपलब्ध झाली. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गट- गण रचनेवर एकूण ९२ हरकती दाखल झाल्या होत्या. जामखेड तालुक्यातून तब्बल ४४ हरकतींचा त्यात समावेश होता, पारनेर १५, अकोले १०, नगर ८, संगमनेर ५, कर्जत ४, कोपरगाव आणि राहाता प्रत्येकी ३, श्रीगोंदा, नगर, शेवगाव आणि राहुरी तालुक्यातून प्रत्येकी १ अशा हरकती दाखल झाल्या होत्या. नेवासा, श्रीरामपूर आणि पाथर्डी तालुक्यात एकही हरकत दाखल झाली नव्हती.

सर्व दाखल हरकती गट व गणातून गाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशाच स्वरूपाच्या आहेत. १४ जुलैला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण याचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केला होता. त्यावर २१ जुलैपर्यंत हरकती व सूचना देण्याची अंतिम मुदत होती. प्रारूप प्रभाग रचना जाहीर करताना जिल्हा परिषदेचे ७५ व पंचायत समितीचे १५० गणांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची नावे व नकाशा जाहीर करण्यात आले होते. ही रचना २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर असून झिकझॅक पद्धतीने हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

अकोल्याच्या समशेरपूरपासून ते जामखेडच्या खर्डापर्यंत असा हा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतर हरकती व सूचनांचा पाऊस पडेल असे वाटले होते. प्रत्यक्षात दिलेल्या मुदती ९२ तक्रारी आल्या होत्या. दाखल झालेल्या हरकतींपैकी जामखेड, पारनेर, कोपरगाव व श्रीगोंदा तालुक्यातील २३ हरकती मान्य झाल्या असून उर्वरित ६९ हरकती फेटाळण्यात आल्या आहेत. येत्या १८ ऑगस्टला जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

आरक्षणावर रंगणार आशा-निराशेचा खेळ

गट-गण प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये खरी उत्सुकता आहे ती आरक्षणाबाबत. अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला आरक्षण कोणत्या गट व गणांमध्ये पडणार याकडे लक्ष असणार आहे. त्यानुसार इच्छुकांमध्ये आशा निराशेचा खेळ रंगेल. लोकसंख्येच्या आधारावर उतरत्या क्रमाने व गेल्या पाच निवडणुकांतील आरक्षण (सन २००२) लक्षात घेऊन सोडत काढली जाणार आहे.