अहिल्यानगर: शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलातील बहुउद्देशीय हॉलचे भाडेवाढ केल्याच्या निषेधार्थ बॅडमिंटन खेळाडूंनी काळ्या फिती लावून जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या निर्णयाचा निषेध केला. सुविधा नसतानाही भाडेवाढ केल्याकडे खेळाडूंनी लक्ष वेधले.

खेळाडूंनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले, की जिल्हा क्रीडा संकुलातील बहुउद्देशीय हॉलमध्ये दहा बॅडमिंटन कोर्ट आहेत. दिवसभरात तेथे ४५० ते ५०० खेळाडू बॅडमिंटन खेळाचा सराव करतात. तेथे तीन अकादमी सुरू आहेत. त्यांमध्ये २७५ खेळाडू प्रशिक्षण घेतात. तेथील कोर्टवर स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छता नाही. सांडपाण्याची व्यवस्था, हवा खेळती राहण्याची सुविधा, व्यायामशाळा आदी सुविधा नाहीत. पावसाळ्यात कोर्ट गळते. तरीही दरमहा २५०० रुपये असलेले भाडे ४ हजार रुपये करण्यात आले.

ही वाढ ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ही भाडेवाढ मनमानी आहे. खेळाडूंना चांगल्या सुविधा द्याव्यात. नंतरच भाडेवाढीचा निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा क्रीडा अधिकारी शासनाच्या नियमांची पायमल्ली करत आहेत. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी अचानक भाववाढीची नोटीस पाठवून पाठवली. जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचीही जिल्हा क्रीडा कार्यालयाने दिशाभूल करून भाडेवाडीच्या प्रस्तावास मान्यता मिळवल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बॅडमिंटन कोर्टवरील समक्ष पाहणी केल्यास त्यांना वस्तुस्थिती समजेल, असाही दावा करण्यात आला आहे.

खेळाडूंनी आमदार संग्राम जगताप, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाही निवेदन पाठवले आहे. राज्यातील इतर ठिकाणी असलेल्या बॅडमिंटन कोर्टच्या वाजवी दराच्या पावत्याही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना खेळाडूंनी सादर करत भाडेवाढीचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय थकीत शुल्काबाबत अनावश्यक गुप्तता पाळते तसेच सरकारच्या क्रीडा धोरणाचीही पायमल्ली करते, याची सखोल चौकशी करण्याची मागणी खेळाडूंनी केली आहे.

जिल्हा क्रीडा संकुल उभारून अनेक वर्षांचा कालावधी झाला, मात्र तिथे अद्यापि पूर्ण क्षमतेने विविध खेळांची मैदाने तयार झालेली नाहीत. शिवाय तयार झालेल्या मैदानांचाही पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. या सर्व सुविधांसाठी राज्य क्रीडा विभागाकडून सुधारित आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्याला निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे. संकुलात अस्वच्छताही असते, अशी खेळाडूंची तक्रार आहे. जिल्हास्तरावरील संकुल असले तरी खेळांच्या स्पर्धा मात्र तेथे अपवादात्मक होतात. जिल्हा क्रीडा अधिकारी पदही रिक्त आहे. त्याची प्रभारी सूत्रे तालुका क्रीडा अधिकारी पदावरील व्यक्तीकडे देण्यात आली आहेत. जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलेही अस्वच्छतेचे आगार बनले आहेत. ‌