अहिल्यानगर : नाबार्डच्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये जिल्हा सहकारी बँकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी बँक म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘यशदा’ (पुणे) संस्थेतील समारंभात केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा पुरस्कार (सन २०२३-२४) बँकेचे संचालक अंबादास पिसाळ व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे यांनी स्वीकारला.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांसह सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण ही महत्त्वाकांक्षी योजना तसेच शेतकरी, ठेवीदार व सहकारी संस्थांसाठी उत्कृष्ट सेवा याचा विचार करून नाबार्डने हा सन्मान केला.
जिल्हा बँक शेतकरी आणि सहकारी संस्थांना नेहमीच सर्वोतोपरी मदत आणि सहकार्य करते, जिल्ह्याच्या विकासाचे केंद्रबिंदू म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिले जाते. नाबार्ड ही देशाची मानाची संस्था असल्याने जिल्हा बँकेस पुरस्कार मिळणे हे बँकेच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे, असे बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले. सध्या बँकेचे भागभांडवल ३८१ कोटी, निधी १४४१ कोटी, ठेवी ९८८६ कोटी, गुंतवणूक ४७८३ कोटी, कर्जे वितरण ६८९६ कोटी, खेळते भांडवल रुपये १३४५८ कोटी रुपये, नेट एनपीए शून्य टक्के आहे. त्यामुळे जिल्हा बँक भक्कम आर्थिक पायावर उभी आहे व देशात लौकिक प्राप्त आहे. पाच लाखावरील कर्जदार सभासदांकरिता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना बँकेच्या स्वनिधीतून राबवत असल्याची माहिती कर्डिले यांनी दिली.