अहिल्यानगर : जिल्ह्यातील ११ नगर परिषद व १ नगर पंचायत अशा एकूण १२ पालिकांची निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभाग रचना व सदस्य संख्या निश्चितीचे काम सुरू केले आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ८ नगरपरिषदांमधील सदस्य संख्या ३ ने तर तीन नगरपरिषदांमधील सदस्य संख्या २ ने वाढणार आहे. एका नगरपंचायतीची सदस्य संख्या मात्र आहे तेवढीच म्हणजे १७ राहणार आहे. महापालिकेसह जिल्ह्यातील निवडणूक प्रलंबित असलेल्या १२ पालिकांच्या निवडणुकांसाठी पूर्वतयारी सुरू झाली आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सन २०११ च्या लोकसंख्येनुसार महापालिकेची सदस्य संख्या व प्रभाग रचना आहे तेवढीच म्हणजे, सन २०१७ च्या निवडणुकी इतकीच राहणार असली तरी नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सदस्य संख्येत बदल झालेला आहे.

राज्य सरकारच्या सन २०२२ मधील अध्यादेशानुसार प्रभाग सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यात ‘अ’ वर्ग नगरपरिषदांसाठी १ लाख लोकसंख्येसाठी ४० सदस्य संख्या व त्यानंतर प्रत्येकी ८ हजार लोकसंख्येसाठी आणखी १ सदस्य राहील. ब वर्ग नगरपरिषदांसाठी ४० हजार लोकसंख्येसाठी २५ सदस्य व त्यानंतर प्रत्येकी ५ हजार लोकसंख्येसाठी १ सदस्य तसेच क वर्ग नगरपरिषदांच्या २५ हजार लोकसंख्येसाठी २० सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.

बारा पालिकांसाठी प्रभाग रचना

जिल्ह्यात नेवासे नगरपंचायत तर श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर येथे ‘ब’ वर्ग नगरपरिषद आहे. राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, श्रीगोंदे, राहाता, शिर्डी, जामखेड व शेवगाव या ‘क’ वर्ग नगरपरिषदा आहेत. दोन वर्षांपूर्वी शिर्डी नगरपंचायतचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाले. या एकूण १२ पालिकांसाठी प्रभाग रचना केली जात आहे. जिल्ह्यात एकही नगरपरिषद ‘अ’ वर्ग नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसंख्या, प्रभाग व सदस्य संख्या

प्रभाग रचना सुरू असलेल्या पालिकांची लोकसंख्या, प्रभाग व सदस्य संख्या पुढीलप्रमाणे- संगमनेर: लोकसंख्या ६५ हजार ८०४, प्रभाग २५, सदस्य ३०, राहाता: लोकसंख्या २२ हजार ३३५, प्रभाग १०, सदस्य २०, पाथर्डी: लोकसंख्या २७ हजार २११, प्रभाग २०, सदस्य २०, देवळाली प्रवरा: लोकसंख्या ३० हजार ९९७, प्रभाग १०, सदस्य २१, शिर्डी: लोकसंख्या ३६ हजार ४, प्रभाग २१, सदस्य २३. राहुरी: लोकसंख्या ३८८१३, प्रभाग १२, सदस्य २४, जामखेड: लोकसंख्या ३९५५१, प्रभाग १२, सदस्य २४, शेवगाव: लोकसंख्या ३८ हजार ३७५, प्रभाग १२, सदस्य २४. श्रीगोंदा: लोकसंख्या ३१ हजार १३४, प्रभाग १२, सदस्य २२ श्रीरामपूर: लोकसंख्या ८९ हजार २८२, प्रभाग १७, सदस्य ३४. कोपरगाव: लोकसंख्या ६९ हजार ५३७, प्रभाग १५, सदस्य ३०.