अकोले: ‘द ‘ दारूचा नव्हे तर ‘द’ दुधाचा असे म्हणत आज, गुरुवारी आषाढ अमावस्येच्या सायंकाळी दुधाचे वाटप करीत दारूबाबतच्या प्रबोधनाचा आगळा उपक्रम राबविण्यात आला. ‘एकच निर्धार करुया, दारू बंद करुया’ असे म्हणत तालुक्यातील दारू बंद करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. लिंगदेव या गावातील महिलांनी आक्रमक होत अवैध दारू विकीची ४ दुकाने उद्ध्वस्त केली. या महिलांचे अभिनंदन करण्यात आले.
ग्रामीण भागात आषाढी अमावस्या ‘गटारी अमावस्या’ म्हणून ओळखली जाते. या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जाते. याला आळा घालण्याच्या उद्देशाने येथील साऊ एकल महिला समितीच्या माध्यमातून येथील बसस्थानक परिसरात दूध वाटप कार्यक्रम मोहीम आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी महिलांच्या पुढाकाराने होत असणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत केले. तालुक्यात अलीकडेच मोठ्या प्रमाणात गुटखा पकडण्यात आला. त्यामुळे तालुक्याची मान खाली गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अवैध दारू विक्री कोणत्याही स्थितीत बंद झाली पाहिजे, असे त्यांनी तहसीलदारांना बजावले. लिंगदेव येथील महिलांनी अवैध दारू अड्डे बद केल्याचे त्यांनी जाहीर कौतुक केले.
तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. दीपक महाराज देशमुख याचे भाषण झाले.एकल महिला समितीच्या अध्यक्ष प्रतिमा कुलकर्णी यांनी एकल महिलांपैकी निम्म्या महिलांना व्यसनी पतीमुळे वैधव्य आल्याची माहिती दिली. डॉ संदीप कडलग यांनी आभार मानले.
ग्रामपंचायत सदस्याकडूनच दारू विक्री
तालुक्यातील लिंगदेव गावातील महिलांनी उग्ररूप धारण करीत गावातील चार अवैध दारू दुकाने उद्ध्वस्त केली. दुकानाची तोडफोड करतानाच दारू विक्रेता तसेच काही दारू पिणाऱ्यांनाही महिलांनी चोप दिला. तसेच दारुड्यांना गावाबाहेर हुसकून लावले. विशेष म्हणजे लिंगदेव एक ग्रामपंचायत सदस्यच अवैध दारू विक्री करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.