अहिल्यानगर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वेक्षण करून उमेदवारी दिली जाईल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, शनिवारी भाजपच्या मेळाव्यात जाहीर केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शतप्रतिशत भाजपचा झेंडा फडकवा, पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरा, भाजप इतर पक्षांवर नाही तर इतर पक्ष भाजपवर अवलंबून आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मेळाव्यात ठाकरे गटाच्या माजी उपमहापौर पुष्पा बोरुडे, त्यांचे पती माजी नगरसेवक अनिल बोरुडे, माजी नगरसेवक सुभाष लोंढे, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख जालिंदर वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे मंत्री विखे यांनी स्वागत केले.

जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत काही ठिकाणी पक्षाची ‘एकला चलोरे’ ची भूमिका आहे. तर काही ठिकाणी अर्धी युती झालेली आहे, काही ठिकाणी महायुती झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष माजी महापौर बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, ज्योती दानवे, धनंजय जाधव तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

भानुदास कोतकर व्यासपीठावर

पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमास नगर तालुका बाजार समितीचे माजी सभापती, पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते भानुदास कोतकर हे व्यासपीठावर उपस्थित होते, त्यांचे शहर उपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी स्वागतही केले. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला का, याबद्दल भाजपमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षप्रवेश केल्याचा इन्कार केला. कोतकर हे भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांचे व्याही आहेत.