अहिल्यानगर: बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेल्या नगर एमआयडीसी परिसरातील विविध गावांतील नागरिकांनी निंबळक बाह्यवळण रस्ता चौकात आज, शनिवारी रास्ता रोको आंदोलन करत बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी केली. बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचे लेखी आश्वासन उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
खारेकर्जुने, निंबळक, हिंगणगाव, हमीदपूर, इसळक या गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज निंबळक गावातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. खारेकर्जुने येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या रियंका सुनील पवार या लहान मुलीचा मृत्यू झाला तर निंबळक येथे आठ वर्षांच्या राजवीर रामकिसन कोतकर हा मुलगा जखमी झाला. बिबट्याच्या हल्ल्याच्या लागोपाठ दोन घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बिबट्याला गोळ्या घाला या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलन केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, अजय लामखेडे, डॉ. दिलीप पवार, प्रियंका लामखेडे, बी. डी. कोतकर, घनश्याम मस्के, नाना दिवटे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. रास्ता रोको आंदोलनामुळे बाह्यवळण रस्त्याला वाहनांच्या लांबवर दुतर्फ रांगा लागल्या होत्या. ग्रामस्थ संतप्त झाल्याने आंदोलन बराच वेळ चालले. अखेर आज सायंकाळपर्यंत बिबट्याला ठार मारल्याचा आदेश प्राप्त होईल असे लेखी आश्वासन जिल्हा उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यापूर्वीही निंबळक गावातील शेकोटीसमोर बसलेल्या रियंका सुनील पवार या पाच वर्षांच्या मुलीला बिबट्याने उचलून नेऊन ठार केले. या घटनेनंतर निंबळक गावातील नागरिकांनी बंद पाळला होता. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाभर बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्ये लहान मुलांसह वृद्ध महिलांचे बळी गेले आहेत. शेकडो पशुधन मृत्युमुखी पडले आहे. नागरिकांचे बळी जाऊ लागल्याने ग्रामीण भागातील लोक आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरू लागले आहेत. वनविभागाने जनजागृतीचे कार्यक्रम सुरू केले आहेत, मात्र ते तोकडे पडत आहेत.
