अहमदनगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल कोतकरला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल कोतकरला नगर तालुक्यातील कामरगाव येथून अटक करण्यात आली आहे. विशाल कोतकरच्या अटकेमुळे आता या गुन्ह्यात तिन्ही आमदारांचा सहभाग होता का, याचा उलगडा होणार आहे.

केडगाव उपनगरात शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व विभागप्रमुख वसंत ठुबे या दोघांची ७ एप्रिल रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दुहेरी हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी विशाल कोतकर हा फरार होता. अखेर मंगळवारी पहाटे पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली. नगर तालुक्यात पुणे रोडवर कामरगाव परिसरातून त्याला अटक करण्यात आली.

ज्या पोटनिवडणुकीच्या वादातून ही हत्या झाली त्या पोटनिवडणुकीत विशाल कोतकर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आला होता. विजयी उमेदवार विशाल कोतकर यानेच मारेकऱ्यांना शिवसेनेचे संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्याकडे पाठवले होते. राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप, हल्लेखोर संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर, भानुदास कोतकर, रवी खोल्लम व अन्य तीन जणांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती.

हत्येच्या दिवशी नेमके काय घडले?
पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रचारावरून शिवसेनेचे संजय कोतकर व वसंत ठुबे यांनी काँग्रेसचे रवी खोल्लम यांना मोबाईल करून शिवीगाळ केली व तुझ्याकडे येतो असे सांगितले. रवीने ही माहिती त्याचा मित्र औदुंबर कोतकरला व त्याने विशाल कोतकरला दिली. विशाल कोतकरने दीपक गुंजाळ याला यासाठी खोल्लमकडे सुवर्णानगरमध्ये पाठवले. गुंजाळ याने बरोबर संजय गिऱ्हे, महावीर उर्फ पप्पू मोकळ व गिऱ्हे याचा मित्र अशा तिघांना बरोबर घेतले. गिऱ्हे याच्याकडेही पिस्तूल होते. हे चौघे रवीच्या घरी पोहोचले तेव्हा तो घरी नव्हता, त्याच्या वडिलांनी तो विशाल कोतकरकडे गेल्याचे सांगितले. गुंजाळ याने कोतकरला मोबाईल करून त्याची खात्री केली. चौघेही तेथून निघत असतानाच संजय कोतकर व वसंत ठुबे तेथे येताना दिसले. दोन्ही गटांत वाद झाले. संजय कोतकरने गुंजाळला एक ठोसा लगावला, गुंजाळनेही त्याला ठोसा लगावला. तेवढ्यात संजय कोतकरने पिस्तूल काढले, दोघांच्या झटापटीत पिस्तूल खाली पडले, तेच उचलून गुंजाळने संजय कोतकरवर दोन गोळ्या झाडल्या, काही अंतरावर वसंत ठुबे होता, त्याचा पाठलाग गिऱ्हे याने केला व पाठीमागून तीन गोळ्या झाडल्या. शिवाय त्याच्यावर गुप्तीने वारही केले. तेथून परतत असताना, काही अंतरावर खाली पडलेला संजय कोतकर मोबाईवर बोलताना दिसला, ते पाहून गुंजाळ याने कोयत्याने त्याच्यावर वार केले तसेच गळाही चिरला.