अनिकेत साठे, नाशिक
सीमावर्ती भागात टेहळणी, शत्रूच्या प्रदेशातील हालचालींवर नजर ठेवण्याबरोबर तोफखान्याचा अचूक मारा व्हावा, यासाठी दिशादर्शनाचे काम करणाऱ्या मानवरहित विमानांची (यूएव्ही) जबाबदारी तोफखाना दलाकडून आता लष्करी हवाई विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
संशयास्पद माहिती टिपण्यासाठी उपयुक्त ठरणारी मानवरहित विमाने साधारणत: दहा वर्षांपूर्वी टप्प्याटप्प्याने लष्करात समाविष्ट झाली होती. तेव्हापासून त्यांचे संचालन आणि नियंत्रण तोफखान्याच्या अखत्यारीत टेहळणी आणि लक्ष्य संपादन (साटा) विभागामार्फत केले जात होते. या विमानांच्या कामगिरीचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या स्वतंत्र तुकडय़ा स्थापन करण्यात आल्या. त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तोफखाना दल लक्ष्यावर गोळे डागू शकते. शिवाय, तोफांचा मारा अचूक झाला किंवा नाही, याचे अवलोकन ही विमाने करतात. यासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी देवळालीतील तोफखाना स्कूलने ‘अंतर्गत-बाह्य़ वैमानिक आणि निरीक्षक’ या खास अभ्यासक्रमाची निर्मिती केली. तीन महिन्यांत विमान हाताळणीचे प्राथमिक शिक्षण देऊन भटिंडास्थित केंद्रात प्रगत शिक्षण देण्यात येत होते. या प्रशिक्षणातही विमानांचे अनेक अपघात झाल्याची उदाहरणे आहेत. याच काळात दाखल झालेल्या नव्या क्षेपणास्त्रांमुळे तोफखान्याची मारक क्षमता विस्तारली. सुरक्षित उड्डाण, उपकरणांची तपासणी आदी निकषांवर विमानांचे संचालन आवाक्याबाहेर जाऊ लागले. ही जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बढतीवर परिणाम झाला. कारण, त्यांचे वरिष्ठ या क्षेत्राबाबत अनभिज्ञ होते. खरे तर या क्षेत्रात उड्डाण सुरक्षा ही संस्कृती आहे. त्यासाठी उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीला महत्त्व दिले जाते. त्यांचे दस्तावेजीकरण होते. तोफखाना दलाची कार्यपद्धती त्यास अनुकूल नसल्याचे अधिकारी सांगतात.
या पाश्र्वभूमीवर, वायुवाहन चालविण्याच्या शास्त्रातील निष्णांत लष्कराच्या हवाई विभागाकडे नुकतीच मानवरहित विमानांची धुरा देण्यात आली. या विभागाकडे सुमारे ३५० हेलिकॉप्टर्स आहेत. त्यांच्यामार्फत हवाईमार्गे रसदपुरवठा, युद्धभूमीवरून जखमी सैनिकांना वाहून नेणे, नैसर्गिक आपत्तीत बचाव मोहीम आदी कार्य केले जाते. अनेक युद्धे, देशासह परदेशातील मोहिमांमध्ये सहभाग असा तीन दशकांचा विभागाचा अनुभव आहे. तोफखाना दलाकडून मानवरहित विमाने या विभागाकडे सोपविण्याचे काम सुरू झाले आहे. ही प्रक्रिया पुढील एक-दोन महिन्यांत पूर्णत्वास जाईल, असे सूत्रांनी सांगितले. या विमानांच्या साहाय्याने सीमावर्ती भागात टेहळणी आणि तोफखाना दलास अचूक माऱ्यासाठी दिशादर्शन हवाई विभाग करणार आहे.
विमानांची क्षमता: लष्कराकडे इस्रायल बनावटीची सर्चर मार्क एक, सर्चर मार्क दोन आणि हेरॉन या मानवरहित विमानांचा ताफा आहे. आकाराने लहान असणारे हे विमान सहसा रडारच्या कक्षेत येत नाही. दूरस्थ नियंत्रकाच्या साहाय्याने त्याचे संचालन तीन अधिकाऱ्यांचे पथक करते. लष्कराकडील विमानांची १२० किलोमीटपर्यंत धडक मारण्याची क्षमता आहे. सलग १२ ते १५ तास ते उड्डाण करू शकतात.
भटिंडाचे केंद्र नाशिकमध्ये : लष्करी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर वैमानिकाचे प्रशिक्षण येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलकडून दिले जाते. या अभ्यासक्रमाच्या जोडीला आता मानवरहित विमानांच्या प्रशिक्षणासाठी नव्या अभ्यासक्रमाची आखणी केली जाणार आहे. यासंबंधीचे शिक्षण देणारे तोफखान्याच्या अखत्यारीतील भटिंडास्थित केंद्र नाशिकच्या या स्कूलमध्ये समाविष्ट केले जाईल. भटिंडय़ाहून ते नाशिकला हलविण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
