सदोष सेवेबद्दल सव्वा लाखाची नुकसान भरपाई देण्याचा एअरटेलला आदेश

नाशिक महापालिकेचे विद्यमान आयुक्त तथा सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना एअरटेल कंपनीने सदोष सेवेबद्दल एक लाख ३१ हजारांची नुकसान भरपाई द्यावी

नाशिक महापालिकेचे विद्यमान आयुक्त तथा सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना एअरटेल कंपनीने सदोष सेवेबद्दल एक लाख ३१ हजारांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश सोलापूर जिल्हा ग्राहक तक्रार न्याय मंचने दिले आहेत.

डॉ. गेडाम हे एअरटेल कंपनीचे मोबाइल सिमकार्ड वापरतात. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना जून २०१४ मध्ये त्यांना अचानकपणे एका महिन्याचे साडेपाच हजारांचे बील आले होते.
एसएमएस करण्यासाठी त्यांनी ९९ रुपयांचे वेगळे पँकेज घेतले तरीही एप्रिल २०१४ या एका महिन्याचे पाच हजार ८९० रुपये ९६ पसे इतके वाढीव बील आले होते. त्यावर हरकत घेत डॉ. गेडाम यांनी कंपनीकडे संपर्क साधून तक्रार नोंदविली व पाठपुरावाही केला. कायदेशीर नोटीसदेखील पाठविली. परंतु कंपनीने दाद न देता उलट आपले बील योग्यच असल्याचा दावा केला. नंतर पंढरपूरच्या ऐन आषाढी यात्रेच्या काळात कंपनीने त्यांची मोबाइलची सेवा खंडित केली.
डॉ. गेडाम यांनी तातडीची गरज म्हणून वाढीव बील भरून मोबाइलसेवा पूर्ववत करून घेतली आणि नंतर मात्र सदोष सेवेबद्दल कंपनीच्या विरोधात जिल्हा ग्राहक तक्रार न्याय मंचकडे धाव घेतली.
या प्रकरणाची सुनावणी ग्राहक तक्रार न्याय मंचचे अध्यक्ष मििलद पवार-हिरूगडे, सदस्य ओंकारसिंह पाटील व बबिता महंत-गाजरे यांच्यासमोर सुमारे अकरा महिन्यांपर्यंत चालली. एअरटेल कंपनीने एसएमएससाठी आकारलेले दर अवास्तव व चुकीचे असल्याचा निष्कर्ष न्याय मंचने काढला. या अवास्तव बिलापोटी कंपनीने डॉ. गेडाम यांना ७१ हजार १५६ रुपये ९ टक्के व्याजासह द्यावेत. तसेच मानसिक त्रासापोटी ५० हजार आणि तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये द्यावेत, असा आदेश दिला. याप्रकरणी डॉ. गेडाम यांच्यातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी तर एअरटेल कंपनीच्यावतीने विनायक नागणे यांनी काम पाहिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Airtel should pay fine more than one lakh

ताज्या बातम्या