अहिल्यानगर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या, शुक्रवारी श्रीगोंद्यात तर परवा, शनिवारी खासदार शरद पवार नगर शहरात येत आहेत. दोन्ही पवारांच्या कार्यक्रमातील राजकीय भाष्याची उत्सुकता आहे.

श्रीगोंद्यात भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या महायुतीमधीलच विरोधकांना ताकद देण्यासाठी अजित पवारांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात शेतकरी मेळावा होणार आहे. माजी आमदार बबनराव पाचपुते व त्यांचे चिरंजीव आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे श्रीगोंद्यातील बहुतांशी विरोधक एकत्र आले आहेत व त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीपूर्वी श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होणार आहे.

श्रीगोंद्यातील घनःश्याम शेलार, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे, भगवानराव पाचपुते आदींसह माजी आमदार राहुल जगताप यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. शेतकरी कर्जमाफी, घोड कुकडी पाणी प्रश्न, फसवणूक झालेल्या सिस्पे गुंतवणूकदारांचे पैसे मिळण्यासाठी उपाययोजना, संत शेख महंमद महाराज देवस्थानची वक्फ बोर्डाकडे झालेली नोंद आदी विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. याशिवाय ते आमदार पाचपुतेंवर टीका करतात का, याबद्दल औत्सुक्य आहे.

दुसऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार शनिवारी नगरला येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू पाटील यांचा अभीष्टचिंतन सोहळा होणार आहे. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार नीलेश लंके, माजी खासदार यशवंतराव गडाख, समारंभाचे निमंत्रक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित राहणार आहेत.

यानिमित्ताने पक्षाचा कार्यकर्ता मेळावा शनिवारी दुपारी राष्ट्रवादी भवनमध्ये होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले. या मेळाव्यास जिल्हा प्रभारी अशोकबाप्पू पवार, खासदार लंके, प्रसाद तनपुरे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे, माजी आमदार दादा कळमकर उपस्थित राहणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या, शुक्रवारी श्रीगोंद्यात तर परवा, शनिवारी खासदार शरद पवार नगर शहरात येत आहेत. दोन्ही पवारांच्या कार्यक्रमातील राजकीय भाष्याची उत्सुकता आहे.