गेल्या काही दिवसांपासून राज्यात कंत्राटी भरतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. एकीकडे बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून खासगी कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात असल्याची टीका होत आहे. या भरतीमध्ये आरक्षणही नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे. आपल्याला यासंदर्भात विनाकारण ट्रोल केलं जात असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवारांनी आपल्या चर्चेत आलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. “कारण नसताना मला ट्रोल करायचं काम चालू आहे. काल मी दिवसभर मंत्रालयात होतो. एक लाख ५० हजार मुलामुलींची भरती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात चालू आहे. आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि काहीही व्हॉट्सअॅप व सोशल मीडियावर वेगळ्या बातम्या पसरवतात”, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे.

“काही विभागात काही हजारांत कर्मचारी कमी आहेत. त्यांच्या भरतीची प्रक्रिया सध्या चालू आहे. काही ठिकाणी टाटाला आपण भरती करायला सांगितलं आहे. तीन कंपन्या आपण निवडल्या आहेत. त्याशिवाय एमपीएससीकडून भरती केली जाते. काही ठिकाणी ताबडतोब माणसं लागतात. उदाहरणार्थ ३० हजाराची शिक्षकभरती. मागच्या सरकारच्या काळात काय घडलं आणि कुणाकुणावर कारवाई करण्यात आली हे आपल्यासमोर आहे”, असंही अजित पवार म्हणाले.

“एका शासकीय कर्मचार्‍याच्या पगारात खासगी कंपनीचे ३-३ कर्मचारी काम करू शकतात” – अजित पवार

“कधीकधी काहीजण कोर्टात जातात. कोर्टानं काही सूचना केल्या तर त्याचं पालन करावंच लागतं. कारण ते त्यांचे आदेश असतात. शिक्षक विभागात नवे शिक्षक भरती होईपर्यंत मुलांना सांगता येत नाही की भरती होईपर्यंत तुम्हाला त्या विषयाला शिकवायला कुणी नाही. म्हणून आम्ही निवृत्त झालेल्यांना तात्पुरतं भरती करून घेतलं”, असं अजित पवारांनी नमूद केलं.

मागच्या सरकारच्या काळातलाच निर्णय?

दरम्यान, कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय मागच्या सरकारच्या काळातलाच असल्याचं अजित पवार म्हणाले. “तो निर्णय आत्ताचा नाही. तो निर्णय मागच्या सरकारच्या काळातला आहे. त्या काळात कुणाकुणाच्या त्यावर सह्या आहेत हेही मी दाखवायला तयार आहे. आज ते सरकार नाही म्हणून लगेच आमच्या नावाने पावत्या फाडायचं, आम्हाला बदनाम करायचं काम चालू झालं. मलाही कळतं. मीही ३२ वर्षांपासून महाराष्ट्रात काम करतोय. तरुण-तरुणींचे काय प्रश्न आहेत, बेरोजगारीचे काय प्रश्न आहेत हे आमच्याही डोळ्यांसमोर आहेत. ते दूर करण्यासाठी आपण दीड लाखांची भरती करत आहोत. काही ठिकाणी तातडीने माणसं लागतात यासाठी तात्पुरत्या स्वरुपात माणसं भरली. कायमस्वरूपी नाही”, अशी भूमिका अजित पवारांनी यावेळी मांडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांचं ‘ते’ विधान!

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानाच्या संदर्भात अजित पवार आज बोलत होते. “शासकीय कर्मचार्‍यांच्या वेतनावर होणारा खर्च प्रचंड असून एका कर्मचार्‍याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन तीन कर्मचारी काम करू शकतात. राज्याचे वार्षिक बजेट साडेपाच ते सहा लाख कोटींचे असून यापैकी २ लाख ४० हजार कोटींचा खर्च केवळ वेतनावर होतो”, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली होती.