राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून पक्षावर दावा सांगितला जात आहे. त्यामुळे पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं? यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.
खरं तर, भारतीय निवडणूक आयोगानं नुकतंच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासमोरील सुनावणीस वेग आला आहे. या सुनावणीदरम्यान, अजित पवार गटाचे प्रमुख वकील नीरज किशन कौल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी पक्षात नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या कशा केल्या? याबाबत निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद केला, अशी माहिती नीरज कौल यांनी दिली.
हेही वाचा- “अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील, तर…”, सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत
अजित पवार गटाचे प्रमुख वकील नीरज किशन कौल म्हणाले, “अजून सुनावणी सुरू आहे. अजित पवार गटाकडून युक्तिवाद केला जात आहे. माझा युक्तिवाद संपला आहे. आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं की, आमच्या मते पक्षात लोकशाही मूल्यांचं पालन केलं नाही. लोकांची नियुक्ती करताना नियमांचं पालन केलं नाही. २०२२ मध्ये ज्या काही नियुक्त्या झाल्या, त्या नियमांच्या चौकटीत झाल्या नाहीत.”
याशिवाय अजित पवार गटाकडे एक लाख प्रतिज्ञापत्रे आहेत. तर त्यांच्या गटाकडे (शरद पवार गट) ४० हजारापेक्षा कमी प्रतिज्ञापत्रं आहेत. त्यामुळे बहुमत आमच्याकडेच आहे, असा युक्तिवाद निवडणूक आयोगासमोर केला असल्याची माहिती वकील नीरज कौल यांनी दिली.
