शिवसेनेतील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निवाडा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी ( १० जानेवारी ) दिला. तसेच, ‘शिवसेने’चे सारेच आमदार राहुल नार्वेकरांनी पात्र ठरवले आहेत. या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारल्यावर संतापल्याचं पाहायला मिळाले.

पुण्यात अजित पवारांनी गुरूवारी ( ११ जानेवारी ) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी निकालाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करणार का? असा प्रश्न विचारल्यावर “मला फुकटचे सल्ले देऊ नये,” असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांना खडसावलं आहे.

“न्यायाधीशांनी दिलेला निर्णय आपण योग्यच समजतो”

राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर आपली प्रतिक्रिया काय? या प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “जो निर्णय तुम्ही ऐकला तसा मीही ऐकला आहे. न्यायाधीशांनी दिलेला निर्णय आपण योग्यच समजतो.”

“मी माझ्यापुरतं बोलत असतो”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकालाचा वेगळा अर्थ काढला आहे, याबद्दल विचारल्यावर अजित पवारांनी चांगलेच चिडले. “कोण काय भूमिका मांडतात, याच्याशी मला देणं-घेणं नाही. मी माझ्यापुरतं बोलत असतो,” असं अजित पवारांनी म्हटलं.

“मुख्यमंत्र्यांची अभिनंदन कधी करायचं मी ठरवेन”

निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “अहो आमचं सरकारच चालू आहे. मग, कधी अभिनंदन करायचं मी ठरवेन. तुम्ही मला कशाला सांगता… मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीत पत्रकारांनी पडू नये.”

“मी माझं मत मांडण्यासाठी बसलो आहे”

“माझा स्वभाव सरळमार्गी आहे. तुम्ही एखाद्याचं नाव घेत प्रतिक्रिया विचारता. मुळात कोण काय काय बोलले, याच्याशी मला देणं-घेणं नाही. त्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं असतं. मी माझं मत मांडण्यासाठी बसलो आहे,” असं अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रत्येक वाचाळवीराला उत्तर देणं, हे माझं काम नाही”

“आपल्याकडे वाचाळवीर भरपूर आहेत. रोज वाचळवीरांना काहीतरी विधानं केल्याशिवाय झोपच लागत नाही. आता प्रत्येक वाचाळवीराला उत्तर देणं, हे माझं काम नाही. मला मिळालेल्या संधीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न आणि अडचणी सोडण्याचं काम मी करतो,” असं अजित पवारांनी सांगितलं.