गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी अनेकदा यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपण पक्षात नाराज नाही, असं त्यांनी कित्येकदा सांगितलं आहे. असं असलं तरी राज्यातील विविध पक्ष अजित पवारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ऑफर देताना दिसत आहे.

शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनीही अलीकडे अजित पवारांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. “अजित पवार यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. ते विरोधी पक्षाचे जबाबदार नेते आहेत. त्यांनी सरकारमध्ये यावं, अशी आमची इच्छा आहे,” अशी खुली ऑफर दीपक केसरकरांनी दिली. केसरकरांच्या या ऑफरवर अजित पवारांनी स्वत: प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी दीपक केसरकरांच्या राजकीय जीवनातील एक किस्साही सांगितला आहे.

हेही वाचा- “अजित पवारांनी सरकारमध्ये यावं, ते खूप…”, दीपक केसरकरांची खुली ऑफर

छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषेदत केसरकरांच्या ऑफरबद्दल विचारलं असता अजित पवार म्हणाले, “दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना आमदारकीचं तिकीट देण्यात मी फार महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हा ते मंत्री नव्हते. पण आता एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर दीपक केसरकर मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळ गेले. केसरकरांना प्रवक्ते पदाची जबाबदारी मिळाली.”

हेही वाचा- “अजितदादा राजकारणातले अमिताभ बच्चन”, सुप्रिया सुळेंच्या विधानावर स्वत: अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले, “भावाच्या प्रेमापोटी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एकनाथ शिंदेंनी केसरकरांना आता मंत्रीही केलं आहे. शिक्षणाची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पूर्वाश्रमीचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता, केसरकरांना माझ्या मदतीची आठवण आली असेल. त्याच आठवणीतून केसरकरांच्या तोंडून ते शब्द बाहेर आले असतील,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.