राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता पक्षात दोन गट पडले आहे. या दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जिथे जिथे सभा घेऊन अजित पवार यांच्या गटावर टीका करत आहेत त्या त्या ठिकाणी अजित पवार गटाकडूनही सभांचं आयोजन केलं जात आहे. शरद पवारांनी अलिकडेच बीड आणि कोल्हापूरमध्ये सभा घेतल्या. या जाहीर सभांमधून शरद पवार यांनी अजित पवार आणि इतर बंडखोर नेत्यांवर जोरदार टीका केली. त्यापाठोपाठ अजित पवारांच्या गटाने बीडमध्ये सभा घेतली. आता शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार गटाने आज कोल्हापुरात सभा घेतली.

कोल्हापुरातील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की अजित पवार आणि बाकिच्या लोकांनी असा निर्णय का घेतला? यावर काहीजण सांगतात आमच्यावर दबाव होता, आमच्यावर दबाव असल्याची टीका होते. जरूर आमच्यावर दबाव होता, परंतु मला एकच सांगायचं आहे की आमच्यावर लोकांची कामं पूर्ण करण्याचा दबाव होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अडीच वर्ष आम्ही सरकारमध्ये काम करत असताना आम्ही जनतेची अनेक कामं हाती घेतली होती. हाती घेतलेली कामं पूर्ण करण्याचा दबाव आमच्यावर होता. आमदारांच्या कामांना स्थगिती होती, ती स्थगिती उठवण्याचा दबाव आमच्यावर होता. यासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो यात आमची काय चूक झाली? याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही दबाव आमच्यावर नव्हता.

हे ही वाचा >> “सरकारला निजामाचे पुरावे चालतात, पण छत्रपतींचे नाही”, काँग्रेसच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार म्हणाले, आम्ही कुठल्याही दबावाला भिक घालणारी माणसं नाही. आम्ही पण मराठ्याची अवलाद आहोत, शेतकऱ्याची मुलं आहोत. वेगवेगळ्या प्रकारे आमची बदनामी करण्याचे प्रकार सुरू आहेत. परंतु,त्यात काही तथ्य नाही. मला एकच सांगायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे आणि आम्ही त्याच मार्गाने चालत आहोत.