Ajit Pawar on Dattatray Bharne’s Statement : राज्याचे नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल अधिकाऱ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. “सरळ काम सगळेच करतात. मात्र, एखादं काम वाकडं करून परत सरळ करणाऱ्यांची माणसं नोंद ठेवतात”, असं वक्तव्य कृषीमंत्री भरणे यांनी केलं आहे. महसूल विभागाकडून पारदर्शकता, प्रामाणिक सेवा अपेक्षित असताना वाकडं काम करून परत सरळ करण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भरणे यांच्या आगामी काळातील कारभाराबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भरणे यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“लोकांची कामं करत असताना कधीकधी नियम बाजूला ठेवून मार्ग काढावा लागतो, अशा अर्थाचं ते वक्तव्य होतं. बऱ्याचदा मंत्री व कॅबिनेट जनतेची कामं करत असताना तसे निर्णय घेतं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरणे यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ न काढण्याचा सल्ला दिला आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, “दत्तात्रय भरणे कृषीमंत्री व्हायच्या आधी त्यांनी इंदापुरात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तिथे त्यांनी सदर वक्तव्य केलं. आम्ही जसे नियम करतो, तसेच कधी कधी लोकांकरिता, त्यांचा एखादा प्रश्न सोडवायचा असेल तेव्हा, जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवत असताना काही नियम फार अडचणीचे ठरत असतील तर आम्ही त्यावर मार्ग काढतो. जनतेच्या भल्याकरता, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नियम थोडे बाजूला ठेवून त्यातून मार्ग काढावा लागतो. फक्त तो मार्ग काढताना तो संविधानाच्या व कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे, एवढंच बघायचं असतं.”
उपमुख्यमंत्री म्हणाले, “बऱ्याचदा राज्य सरकारला विशेष बाबीचा वापर करावा लागतो. एखादा प्रश्न सोडवताना विशेष बाब म्हणून निर्णय घेण्याचा सरकारला अधिकार आहे. तो अधिकार आम्ही केव्हा वापरतो माहितीय का? केवळ एखाद्या व्यक्तीला फायदा देण्यासाठी नव्हे तर, लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला तो वापरावा लागतो. मुख्यमंत्री असतील किंवा इतर सहकाऱ्यांना तो वापरावा लागला तर ते तसा निर्णय घेतात. राहिला प्रश्न दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याचा तर, मराठी भाषा ही आपण अर्थ काढावा तशी आहे. लोकांना वाट्टेल तसा ते अर्थ काढू शकतात. म्हणजे आता काहीजण बोलतायत की बघा कृषीमंत्री असं म्हणाले वगैरे. परंतु, एखाद्या शेतकरी संकटात आसेल तेव्हा काही नियम बाजूला ठेवून कॅबिनेटमध्ये त्यांच्या हितासाठी निर्णय घेतले जातात. भरणे यांचं सदर वक्तव्य देखील तसंच होतं.”