Ajit Pawar on Agriculture Minister Dattatray Bharne : पुण्यातील वाकड येथे आज (२४ ऑगस्ट) महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचं ६५ वे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या अधिवेशनाला उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी द्राक्ष बागायतदार संघाची प्रगती अधोरेखित केली. तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचं कौतुक केलं. अजित पवार यांच्या हस्ते यावेळी ‘द्राक्ष वृत्त’ या स्मरणिकेचं लोकार्पण तसेच काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
अजित पवार म्हणाले, “मी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनांना नेहमी उपस्थित राहणारा असा कार्यकर्ता आहे. आपण टप्प्याटप्प्याने कसे वाढत गेलो ते बघा. सुरुवातीला आपण पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे छोट्याशा सभागृहात बैठका घ्यायचो. तिथून आपण निसर्ग हॉटेलपर्यंत पोहोचलो. तिथून गेली काही वर्षे आपण टिपटॉप हॉटेलमध्ये अधिवेशन घेतोय. तरीही लोकांच्या अपेक्षा वाढत असतात.”
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “दत्तात्रय भरणे हे आपले कृषिमंत्री स्वतः मोठे शेतकरी आहेत. त्यांनी उत्तम शेती सांभाळली आहे. त्यांचे वडील व काकांनी चांगली शेती केली आहे. त्यांचं सगळं कुटुंब व नातेवाईक शेतात राबत असतात. ही मंडळी इतकी चांगली शेती करतात की लोकांना त्याचा हेवा वाटेल. भरणे कुटुंब द्राक्ष, केळी, डाळिंबाचं पिक मोठ्या प्रमाणात घेतात. ऊसाची देखील चांगली शेती आहे. दरवर्षी ते कारखान्याला १५ ते २० हजार टन इतका ऊस पाठवतात.”
अजित पवारांचा दत्ता भरणे यांना चिमटा
अजित पवार म्हणाले, “कृषिमंत्र्यांबद्दल सारखं काही ना काही तरी निघत होतं. मी ते सगळं बघत होतो. त्यामुळे यावेळी मी ठरवलं की आता असा कृषिमंत्री शोधून काढतो की ज्याच्याबद्दल काहीच निघालं नाही पाहिजे.” यावेळी अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना म्हणाले, “आता मी तुझ्या साक्षीने सगळ्यांना सांगितलं आहे. त्यामुळे तुझ्याबद्दल काहीच निघून देऊ नकोस.”
आम्ही शेतकऱ्यांना बळ देऊ : अजित पवार
अजित पवार यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीत शेतकऱ्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी द्राक्ष उत्पादनातून राज्याच्या समृद्धीत मोलाचा वाटा उचलत आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात नवनवीन प्रयोग, संशोधन व तंत्रज्ञान अवलंबणं ही काळाची गरज आहे. विषमुक्त अन्नधान्य ही भविष्याची दिशा आहे. द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार व कृषी मंत्रालय यांच्याकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेतून जात,धर्म, पंथ न पाहता शेतकरी बांधवांना बळ आम्ही देत राहू.