सावरकर वादावर राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच भूमिका जाहीर, शरद पवारांचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले…

वीर सावरकर वादावर राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच भूमिका जाहीर केली आहे.

ajit pawar on savarkar dispute
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच वीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. माफी मागायला मी सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, गांधी कुणाचाही माफी मागत नाही, असं विधान राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांच्या विधानावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. दरम्यान, रविवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना इशारा दिला.

वीर सावरकर हे आमचे दैवत आहेत. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. यावरून शिंदे गट आणि भाजपानेही टीकास्र सोडलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही सावरकर वादावर आपली भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्या महापुरुषांबद्दल आदर आहे, असं विधान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

हेही वाचा- खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना आणखी एक धक्का, लोकसभा हाऊस कमिटीने बजावली ‘ही’ नोटीस

यावेळी अजित पवार म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी सावरकरांबद्दल त्यांची काय भूमिका आहे? हे परवा मालेगावात सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्या महापुरुषांबद्दल आदर आहे. आपण सगळ्यांनी नेहमी महापुरुषांबद्दल सन्मान आणि आदराचीच भावना ठेवली पाहिजे. काँग्रेसने आपली भूमिका मांडावी. पण आपण (राष्ट्रवादी काँग्रेस) सर्व जाती-धर्माला बरोबर घेऊन पुढे जात आहोत. सर्वधर्म समभाव हीच आपली भूमिका आहे. त्यामध्ये आपल्याला अंतर पडू द्यायचं नाही. आपल्याला प्रत्येक जातीचा, धर्माचा आणि पंथाचा आदर करायचा आहे.”

हेही वाचा- उद्धव ठाकरेंची भाजपाबरोबर पुन्हा युती होणार? राधाकृष्ण विखे-पाटलांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “नवीन युती…”

“कोणत्याही दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही. दरी निर्माण होणार नाही, हीच शरद पवारांची भूमिका आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांची भूमिका आणि त्यांच्या विचारसरणीने आपण पुढे चाललो आहोत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काही बाबतीत एकत्र येतो,” असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 21:19 IST
Next Story
आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करू, जयंत पाटलांचा निर्धार
Exit mobile version