Ajit Pawar Statement on Dhirubhai Ambani: सोमवारी एका कार्यक्रमात केलेल्या भाषणादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचं एक विधान सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं आहे. या विधानावरून अजित पवारांवर टीकाही केली जात असतानाच अजित पवारांनी त्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या विधानातून ‘ध’ चा ‘मा’ करण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. तसेच, कुठे काय बोलायचं, काय नाही बोलायचं हे आपल्याला कळतं, असं अजित पवारांनी संबंधितांना सुनावलं आहे.
धीरूभाई अंबानींबद्दल काय म्हणाले अजित पवार?
अजित पवारांनी बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना धीरूभाई अंबानींचं उदाहरण दिलं. यावेळी त्यांनी धीरूभाई अंबानी आधी पेट्रोल पंपावरच काम करायचे, असा उल्लेख केला. “मला सहकार टिकवायचं नसतं तर मी पंप काढले असते का? माझी गोरगरीबांची मुलं पंपावर लागली ना कामाला? पंपावर मुलं कामावर लागणं कमीपणाचं आहे का? पंपावरच पेट्रोल सोडून धीरुभाई अंबानी कोट्याधीश झाला. त्यामुळे तेही काम काही कमीपणाचं नाही. कुठलंही काम करणं कमीपणाचं वाटून घेऊ नका. पडेल ते काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे. त्यातून आपण सोनं निर्माण करू”, असं विधान अजित पवारांनी सोमवारी केलं होतं.
अजित पवारांच्या विधानातून काय अर्थ काढण्यात आला?
धीरूभाई अंबानी पेट्रोल सोडून कोट्याधीश झाले याऐवजी पेट्रोल ‘चोरून’ असा उल्लेख अजित पवारांनी केल्याचे दावे केले जाऊ लागले. त्यावरून अजित पवारांवर टीका होऊ लागली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी अजित पवारांचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे. “पंपावर पेट्रोल चोरून कोट्याधीश झाले आणि तुम्ही? सिंचन घोटाळा, एमएससीबी घोटाळा करून आपण काय केलंत?” असा सवाल अंजली दमानियांनी सोशल पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
…तर मी राजकारण सोडेन – अजित पवार
दरम्यान, धीरूभाई अंबानींबाबत आपण कोणतंही चुकीचं विधान केलं असेल तर मी राजकारण सोडेन, असं अजित पवारांनी बारामतीमधील दुसऱ्या एका कार्यक्रमात स्पष्टीकरणादाखल म्हटलं. साखर कारखान्यांच्या निवडणुकांसाठी सध्या स्थानिक राजकारणात प्रचाराची रणधुमाळी दिसून येत असून त्यासाठी अजित पवार ठिकठिकाणी प्रचारसभा घेताना दिसून येत आहेत. यातीलच एका प्रचारसभेत त्यांनी केलेल्या विधानावरून चर्चा सुरू झाली.
“मी तिथे असं म्हणालो की एकेकाळी धीरूभाई अंबानी स्वत: पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते. पण माझं विधान वेगळंच काहीतरी दाखवलं गेलं. मी जर वेगळा काही शब्द वापरला असेल तर राजकारण सोडेन. मला कळत नाही का? मला फक्त लोकांना एवढंच सांगायचं होतं की काही लोकांना मार्केट कमिटी किंवा दूधसंघ किंवा संस्थेच्या पंपावर पेट्रोल सोडायचं काम मिळतं. उद्या माझ्यावर टीका होईल की पेट्रोल सोडायचं काय काम झालं का? म्हणून मी ते उदाहरण दिलं”, असं अजित पवार म्हणाले.
“आम्ही लहानपणी ऐकलं की धीरूभाई अंबानी पेट्रोल सोडायचं काम करायचे. पण त्यावरून इतकं वेड्यासारखं काहीतरी चालू आहे. आम्हीही जबाबदार नागरीक आहोत. काय बोलावं, काय बोलू नये हे कळतं. मागे झालेल्या चुकांची जबरदस्त किंमत आम्ही मोजली आहे. त्यासाठी मी आत्मपरिक्षणही केलं आहे. हा ध चा मा करण्याचा प्रयत्न केला गेला”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.