तीन पक्षाची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धक्का दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच भूकंपासारखे हादरे देणारे निर्णय अजित पवार यांनी घेतले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय विश्व त्यांनी हादरवून सोडले. महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्षात येत असल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांचा गड भाजपाला जाऊन मिळाला आणि रात्रीतून सत्तास्थापनेचे सारे चित्रच पालटले.

यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. आता राज्याला स्थिर सरकारची गरज असल्याचे सांगत अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला.

यापूर्वी अजित पवार यांनी 2014 साली  आघाडी सरकारमध्ये असताना अखेरच्या काही महिन्यांमध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजकीय खळबळ माजली होती. त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर काही काळ हा गोंधळ कायम होता.

गेल्या काही दिवसांपूर्वीही अजित पवार यांंनी असाच खळबळजनक निर्णय घेतला होता. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा पाठी लागल्यानंतर अजित पवार यांनी कोणालाही कल्पना ने देता आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांचा निर्णय खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही माहीत नव्हता. त्यावेळीही राष्ट्रवादीत अनेकांना धक्का बसला होता.

आता सारी राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीच्या बाजूने असताना अजित पवार यांनी चर्चांना कंटाळून भाजपाला पाठिंबा जाहीर केला आणि पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीतील अनेकांना अजित  पवार यांची ही खेळी माहीतच नव्हती.  शिवाय शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनाही याची कल्पना नव्हती.

शुक्रवारच्या रात्रीपर्यंत मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान होतील, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र एका रात्रीत चित्रच पालटले. अजित पवार यांनी एका रात्रीत  महाराष्ट्राच्या राजकारणाचा पटच बदलून टाकला.