अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मुंबईत जेवढे रंग उधळले जात आहेत तेवढेच नाशिक विभागात येणाऱ्या नगर जिल्ह्य़ातही अवघे दोनच उमेदवार असताना खेळले जात आहेत. मतपत्रिका ताब्यात घेण्याच्या प्रकारातून संगमनेर येथे सोमवारी बराच मोठा म्हणजे दिवसभराचा नाटय़प्रयोग रंगला, मात्र अखेर त्यावर पडदा पडला.
नगर जिल्हा परिषदेच्या नाशिक विभागात येतो. या विभागाला शिखर कार्यकारिणीत ४ जागा असून त्यात  नगर जिल्ह्य़ाला १ जागा आहे. त्यासाठी विनय आपटे यांच्या पॅनेलमधून संगमनेरचे प्रा. विजय दळवी हे उमेदवार आहेत तर नगरमधून परिषदेच्या नगरच्या शाखेचे संस्थापक सतीश लोटके उभे आहेत. त्यांना माजी अध्यक्ष मोहन जोशी यांच्या पॅनेलने पुरस्कृत केले आहे. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून नगरच्या नाटय़ चळवळीशी संबधित सक्रिय कार्यकर्ते आहेत.
निवडणुकीच्या मतपत्रिका मतदारांना टपालाने पोहचवण्यात येत आहेत. आता त्या टपालात पडल्या असून मतदारांपर्यंत पोहचत आहेत. तत्पूर्वीच त्या थेट पोस्टातून ताब्यात घेण्याचा प्रकार संगमनेरला झाला. असे काही होते का यावर लोटके समर्थक कार्यकर्ते लक्ष ठेवून होते. पोस्ट कार्यालयात त्यांनी मतपत्रिका आल्या का अशी चौकशी केल्यावर तेथील कर्मचाऱ्याने त्यांना सरळ आलेल्या मतपत्रिका दळवी सर घेऊन गेल्याचे सांगितले व महाविद्यालयाची पत्र ते नेत असतात अशीही माहिती दिली.
ते समजताच राहुल हांडे व तुळशीराम जाधव या लोटके समर्थकांनी पोस्टमास्तरांकडे लगेचच लेखी तक्रार केली. त्याची प्रत संगमनेर पोलिसांकडेही त्यांनी दिल्यामुळे पोस्टमास्तरांना तक्रारीची दखल घेणे भाग पडले. त्यांनी पोस्टमनला विचारले. त्याने निरागसपणे कॉलेजची पाकिटे नेहमी दळवी सरच नेतात असे सांगितले. त्यामुळे दळवी यांना बोलावून घेण्यात आले. त्यांनी संबधित मतदार आपल्या कॉलनीतील तसेच महाविद्यालयातीलच असल्याने त्यांची पाकिटे नेली असे उत्तर दिले. दोन पाकिटांच्या पत्त्यावर असलेला केअर ऑफ दळवी असा उल्लेखही त्यांनी पोस्टमास्तरांना दाखवला.
त्यावरून मग हांडे व जाधव यांनी मतपत्रिका ताब्यात घेतल्या गेल्या असल्याची माहिती उमेदवार लोटके यांना दिली. त्यानंतर मग या प्रकरणात अधिकच रंग भरला. ही वादावादी सुरू असतानाच प्रकरण आपल्या अंगाशी येईल असे लक्षात आल्यावर पोस्टमनने दळवी यांना संबधित पाकिटे आणून देण्याची विनंती केली. आपला हेतू वाईट नव्हताच असे सांगत दळवी यांनीही लगेचच त्यांनी घेतलेली पाचही पाकिटे आणून दिली. पोस्टमास्तरांनी ती ताब्यात घेतली व सील करून टाकली. दरम्यान तक्रारदारांनी आपली तक्रारही मागे घेतली असल्याची माहिती मिळाली.
याबाबत दळवी यांनी सांगितले की मतपत्रिका ताब्यात घेण्याचा हेतू असला असता तर नेलेली पाकिटे परत आणून दिलीच नसती. अत्यंत प्रामाणिकपणे व परिषदेच्या शिखर कार्यकारिणीवर जिल्ह्य़ाला प्रतिनिधीत्व असावे याच एकमात्र हेतूने आपण निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे असे काही करण्याचे कारण नाही व तो आपला स्वभाव नाही. लोटके यांनी झाला प्रकार चुकीचा होता, व्हायला नको होता, पारदर्शीपणे मतदान व्हावे अशीच आपली भूमिका आहे असे स्पष्ट केले. मतदार काय करायचे व कोणाला मतदान करायचे ते ठरवतील, मतपत्रिका ताब्यात घेऊन मतदान नको असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhil bharatiya natya parishad election become interesting
First published on: 30-01-2013 at 12:28 IST