अकोला : ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, पर्यटनस्थळांसह कृषी क्षेत्राची समृद्ध पार्श्वभूमी लाभलेला अकोला जिल्हा गेल्या काही वर्षांपासून विकासाच्या नव्या वाटेवर आला. महामार्गाच्या बांधणीमुळे रस्ते विकास, मध्य व दक्षिण मध्य रेल्वेच्या सुविधांमध्ये वाढ होत असली तरी धावपट्टी विस्ताराअभावी शिवणी विमानतळावरून ‘उड्डाणा’ची प्रतीक्षा आहे. औद्याोगिक विकासासाठी हवाई सेवेची गरज दिसून येते.
जिल्ह्यात कर्ज वितरणाचे प्रमाण वाढले. पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्याने विकासाचे आशादायक चित्र आहे. १० वर्षांपासून जिल्ह्याला प्राप्त झालेल्या भरघोस निधीतून अनेक प्रकल्प मार्गी लागले. जिल्ह्यातील बहुतांश उद्याोग, व्यवसाय व रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामुळे विदर्भातील कृषी संशोधनाला अकोल्यातून गती मिळाली, तर महाबीजच्या मुख्यालयामुळे संपूर्ण राज्याला बियाणे पुरवठ्यात जिल्ह्याची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. दाल मिल प्रक्रिया उद्याोगाचे जाळे असून त्यातून रोजगार निर्मिती झाली. लागवडीयोग्य क्षेत्र चार लाख ५५ हजार ३२६.९४ हेक्टर असून एकापेक्षा अधिक वेळा लागवडीखालील क्षेत्र ८५ हजार ४८६.७३ हेक्टर आहे. ओलिताखालील व लागवाडीयोग्य क्षेत्रामध्ये वाढ झाली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील २७ हजार ४१३ लाभार्थींना घरकुल मंजुरीपत्र व २१ हजार ६२७ लाभार्थींना पहिल्या हप्त्याचे वितरण झाले. चार हजार ६०० घरकुलांचे काम पूर्ण झाले.
जिल्ह्यात उद्याोगांची संख्या १५५१ असून त्यात ९४२ कोटींची गुंतवणूक झाली. त्यातून ४६१२ लोकांना रोजगार मिळाला. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याोगांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली. या तिन्ही प्रकारचे ३५,७१४ उद्याोग कार्यरत असून त्या माध्यमातून १,२०,१०७ जणांना रोजगार उपलब्ध झाला. २,५४७ लाखांची गुंतवणूक यामध्ये झाली. जिल्हा उद्याोग केंद्रामार्फत १५६५, स्थानिक महामंडळाच्या अर्थपुरवठ्यावर १५४ आणि विविध महामंडळांच्या माध्यमातून ७२३ स्वयंरोजगार सुरू झाले. जिल्ह्यात मोठ्या उद्याोगांसह गुंतवणूकवाढीची आवश्यकता आहे.
दरडोई उत्पन्नामध्ये मोठी वाढ
चालू किमतीनुसार स्थूल जिल्हा उत्पन्न ४१ हजार ६१९ कोटी व निव्वळ जिल्हा उत्पन्न ३६ हजार ३९२ कोटी रुपये आहे. हे प्रमाण राज्य उत्पन्नाच्या १.१४ टक्के असून जिल्हा उत्पन्नामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १४.१७ टक्के वाढ झाली आहे. चालू किमतीनुसार म्हणजे सध्याच्या वर्षातील बाजारभावाचा विचार करून काढलेले उत्पन्न. तर स्थिर किमतीनुसार म्हणजे कोणत्याही एका वर्षाच्या स्थिर किमतीवरील उत्पन्न.
कर्ज वितरणाला गती
जिल्ह्यात वर्गीकृत बँका ७७ असून ७० गावांमध्ये त्यांच्या २२९ शाखा आहेत. या बँकांमध्ये १६८०७३९ (आकडे लाख रु.) ठेवी असून २६९७०२ कृषक व ४७७९७१ अकृषक कर्जाचे वितरण झाले. अकोला, वाशीम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६७ शाखा असून यामध्ये २५५५३६ लाखांच्या ठेवी, तर ४३८९१ लाख कृषक आणि ४७२६३ लाखाचे अकृषक कर्ज वाटले. ७०८२३ जणांना मुद्रा योजनेला लाभ मिळाला.
दृष्टिक्षेपात अकोला जिल्हा
● भौगालिक क्षेत्रफळ – ५६७२.८१ चौ.कि.मी. (राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत १.८४ टक्के),
● तालुके – ७, महापालिका – १, नगर पालिका – ५, नगर पंचायत १, पंचायत समिती – ७,
● लोकसंख्या – २०११ च्या जनगणेनुसार १८,१३,९०६ (६०.३२ टक्के ग्रामीण, ३९.६८ टक्के नागरी)
● प्राथमिक शाळा एकूण – १२७९, माध्यमिक शाळा – २९५, उच्च माध्यमिक – २६१, महाविद्यालये – ६१, कृषी विद्यापीठ – १,
● सिंचन प्रकल्प २ मोठे, ३ मध्यम, आरोग्य सेवा रुग्णालय – ७, अतिविशेषोपचार रुग्णालय – १, दवाखाने – ४६, प्राथमिक आरोग्य केंद्र – ४१, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र – १९०.