भौगोलिक मानांकनामुळे खास ओळख मिळालेला अलिबागचा  पांढरा कांदा सध्‍या संकटात सापडला आहे. खराब हवामानाचा फटका या पिकाला बसतो आहे. आधीच अवकाळी पावसामुळे  पिकाची दुबार लागवड करण्‍याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. आता मागील काही दिवसांपासून पडणारे धुके आणि करपा रोगामुळे यंदा कांद्याचे उत्‍पादन ५० टक्‍क्‍यांनी घटणार असल्‍याची भीती शेतकरी व्‍यक्‍त करता आहेत.

 ऐन काढणीच्‍या हंगामातच पांढऱ्या कांद्याच्‍या पिकाला रोगाने ग्रासल्‍याने त्‍याची पाती पिवळी पडली आहे. शिवाय कांद्याची पुरेशी वाढ होत नसल्‍याने छोटा कांदा काढण्‍याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे इथला कांदा उत्‍पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. चविष्‍ट आणि औषधी गुणधर्मामुळे अलिबागच्‍या पांढऱ्या कांद्याची वेगळी ओळख असून त्‍याला बाजारात मोठी मागणी आहे.

अलिबाग तालुक्यात पांढरा कांद्याचे २५० ते ३०० हेक्टर पीक क्षेत्र आहे. गेल्या वर्षी २७० हेक्टवर हे पीक घेण्यात आले. कार्ले, खंडाळे , वाडगाव , वेश्‍वी , मानतर्फे झिराड अशा १० ते १२ गावांमध्‍ये प्रामुख्‍याने पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जाते. यंदा ऑक्‍टोबर नोव्‍हेंबर महिन्‍यात दोन वेळा रोपे वर येण्‍याच्‍या हंगामातच अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्‍यानंतर पुन्‍हा सातत्‍याने हवामानात बदल होत राहिले. कधी कडाक्‍याची थंडी तर कधी ढगाळ हवामान मध्‍ये पडणारे दाट धुके याचा एकत्रित परिणाम कांदा पिकावर झालेला दिसतो आहे. पिकावर थ्रीप्‍सचा प्रादुर्भाव झाल्‍याचेही दिसून येत आहे.

कांदा पिकावर इथल्‍या अनेक कुटुंबांचा गाडा चालतो –

मागील दोन वर्षे करोना आणि लॉकडाउनमुळे मागणी असूनही शेतकरी पुरेसा कांदा बाजारात पाठवू शकले नव्‍हते. त्‍यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आता अस्‍मानी संकटाने डोकं वर काढलं आहे. त्‍यामुळे शेतकरी बेजार आहे. पावसाळयातील भाताचे पीक घेतल्‍यानंतर हिवाळयातील कांदा पिकावर इथल्‍या अनेक कुटुंबांचा गाडा चालतो परंतु यंदा निसर्गाने साथ न दिल्‍यामुळे उत्‍पादनात मोठी घट दिसून येत आहे.

यंदा उत्‍पादनात मोठी घट –

यंदा पांढऱ्या कांद्याचे पीक चांगले येईल अशी अपेक्षा होती परंतु ती फोल ठरली. हवामानात सातत्‍याने होणारे बदल या पिकाला मारक ठरले. धुके आणि ढगाळ हवामानामुळे पिकांची योग्‍य वाढ झाली नाही. पाती पिवळी पडली. यामुळे यंदा उत्‍पादनात मोठी घट होताना दिसत आहे. असं सतीश म्‍हात्रे या कांदा उत्‍पादक शेतकऱ्याने मह्टले आहे.

चांगल्‍या प्रतीचे बियाणे मिळण्‍याची शक्‍यता कमी –

यंदाच्‍या मोसमात दोन वेळा अवेळी पाऊस झाला. शेतात पाणी साचल्‍याने वर आलेली रोपे कुजून गेली. परिणामतः दुबार पेरणी करण्‍याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यात बियाणे संपून गेले. पुढील वर्षीसाठी शेतकरी दरवर्षी बियाण्‍यांकरिता स्‍वतंत्र लागवड करतात परंतु मागील आठवडयात वातावरणात झालेल्‍या बदलांमुळे बियाण्‍यांसाठी केलेल्‍या लागवडीवरदेखील परिणाम झाला असून चांगल्‍या प्रतीचे बियाणे मिळण्‍याची शक्‍यता कमी आहे. यासाठी कृषी विभागाने काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.