राज्यात कुठल्याही खासदाराचा नसेल एवढा माझा लोकसंपर्क आहे. रायगडमधील एकही गाव असे नसेल जिथे गेल्या पाच वर्षांत मी गेलो नाही, असे असूनही जर कोणी म्हणत असेल मी लोकसंपर्क ठेवला नाही, तर त्यांना खासदार कळलेच नाही असे स्पष्टीकरण रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार अनंत गीते यांनी दिले. ते अलिबाग येथे पत्रकारांशी बोलत होते.
शेकाप आमदार जयंत पाटील यांनी पेण येथे झालेल्या शेकाप मेळाव्यात खासदार गीते यांच्या कार्यप्रणालीवर जहरी टीका केली होती. निवडून गेल्यावर गीते यांनी शेकापला कधी विचारले नाही. खासदार निधी टक्केवारी घेण्यात ते व्यस्त होते असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना शेकापला खासदार कधी कळलेच नाही, असे उद्गार गीते यांनी काढले. माझ्या चारित्र्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग दाखवून द्या, मी राजकारण सोडेन, असे आव्हान त्यांनी या वेळी दिले. गेल्या पाच टर्म मी खासदार आहे. केंद्रीय मंत्री म्हणूनही मी काम केले आहे. पण माझ्यावर कोणी टक्केवारीचे आरोप केले नाही. जे लोक हे आरोप करत आहेत ते खोडसाळ वृत्तीचे आहेत, असेही त्यांनी म्हटले.
शेकाप हा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची स्वतंत्र ध्येयधोरणे आहेत. त्यांनी निवडणूक लढवायची की नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे. गेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष आमच्या बरोबर होता. त्याचा फायदा आम्हाला झाला होता. आमच्या युतीमुळे शिवसेनेला जर दोन खासदार मिळाले असतील तर शेकापला तीन आमदार मिळाले होते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
देशात आज काँग्रेसविरोधी लाट आहे. राज्यातही तीच परिस्थिती आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून आत्ताच लोकांनी स्वीकारले आहे. त्यामुळे रायगडातही ही लाट पाहायला मिळेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या निवडणुकीत मला रायगडकरांनी पावणेदोन लाखांच्या फरकाने निवडून दिले. या वेळी त्यापेक्षा अधिक मताधिक्याने मी विजयी होईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आघाडीचे उमेदवार आणि राज्याचे जलसंपदामंत्री यांच्यावरही त्यांनी टीकेची झोड उठवली. मुंबई-दिल्ली कॉरिडोरला रायगडातील जनतेचा विरोध आहे. मात्र तरीही या प्रकल्पाला राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तटकरे हे या कॅबिनेट मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. मग त्यांनी या प्रकल्पाला विरोध का केला नाही? असा सवाल त्यांनी या वेळी केला. या प्रकल्पात ५१ टक्के शेअर हा राज्य सरकारचा असणार आहे. त्यामुळे प्रकल्प आणण्यासाठी घाट घातला जात असल्याचे गीते म्हणाले. रायगडातील राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या तीन प्रमुख सहकारी बँका बुडतात तरीही पालकमंत्री यशस्वी कसे म्हटले जातात? असा सवाल त्यांनी या वेळी केला.
या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुकाप्रमुख हेमंत पाटील, शहर प्रमुख कमलेश खरवले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.