scorecardresearch

अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण: अनिल जयसिंघानींच्या मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, FIR ही दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंं आहे जाणून घ्या

amruta fadnavis in bigg boss marathi
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या पेशाने बॅंकर असून उत्तम गायिकाही आहेत.

मुंबई पोलिसांनी गुरूवारी अक्षन जयसिंघानीला अटक केली आहे. अक्षन जयसिंघानी हा बुकी अनिल जयसिंघानींचा मुलगा आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फसवणूक प्रकरणात अक्षनला ताब्यात घेण्यात आलं आहे. लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रतिक्रिया दिली आहे. मला अडचणीत आणण्यासाठी हा ट्रॅप होता असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अनिल जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षाच्या विरोधातही मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादन करून अनिक्षाने त्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

FIR मध्ये काय म्हटलं आहे?

अनिक्षा सुमारे १६ महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती तसंच अनिक्षा अमृता फडणवीस यांच्या घरीही गेली होती. अनिक्षा आणि माझी पहिली भेट नोव्हेंबर २०२१ मध्ये झाल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

अमृता फडणवीस यांच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही कामे करण्यासाठी प्रयत्न झाला आहे. पहिल्यांदा पैशांची ऑफर देण्यात आली. त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनिल जयसिंगानी नावाचा एक व्यक्ती आहे. जो गेल्या सात ते आठ वर्षापासून फरार आहे. त्या व्यक्तिवर १४ ते १५ गुन्हे आहेत. अनिल जयसिंगानी यांची एक मुलगी आहे. ही मुलगी २०१५-१६ च्या दरम्यान अमृता फडणवीसला भेट होती. त्यानंतर तिचे भेटणे बंद झाले होते. मात्र, अचानक पुन्हा २०२१ नंतर या मुलीने माझी पत्नी अमृता फडणवीस यांना भेटायला सुरु केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या मुलीने मी डिझायनर आहे, माझा व्यवसाय सुरु असल्याचे सांगितले. तसेच प्रभावशाली ५० महिल्यांच्या यादीत माझं नाव आल्याचे त्या मुलीने सांगितले. तसेच आईवर लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन देखील त्या मुलीने अमृता फडणवीस यांच्याकडून करुन घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

डिझायनर असलेल्या अनिक्षा या मुलीने तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी एक कोटी रुपये देण्याची ऑफर केली. माझ्या वडिलांना सोडून द्या असे अमृता फडणवीस यांना सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी अमृता फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की, ते चुकीच्या पद्धतीने अडकले असतील तर त्यांना सोडवता येईल. याबाबत मला काही सांगू नको असे अमृता फडणवीस यांनी सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. बुकीजच्या विषयानंतर अमृता फडणवीस यांनी त्या मुलीला फोनवर ब्लॉक केलं. त्यानंतर काही दिवसांनी अनोळखी नंबरवरुन काही व्हिडीओज, काही क्लिप आल्या. त्या उघडल्या. यामध्ये अमृता फडणवीस आणि त्या मुलीचे झालेले संभाषण होते. मात्र, त्यात गंभीर काहीच नव्हते असे फडणवीस म्हणाले. यामध्ये काही व्हिडीओ आले होते. यामधील काही व्हिडीओमध्ये ती हार घालत होती, काहीमध्ये अंगठी घालत होती, यामध्ये ते परत केल्याचेही दिसत आहे. यामध्ये एक गंभीर व्हिडीओ असा दिसला की एक बॅग आहे, त्यामध्ये ती पैसे भरत असल्याचे दाखवण्यात आले. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये तशीच बॅग ती मुलगी आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देते. असे व्हिडीओ पाठवत एका व्यक्तीने धमकी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितलं ही सगळी माहिती त्यांनी दिली तसंच अक्षनला ताब्यात घेण्यात आल्याचीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 17:43 IST