‘कौन बनेगा करोडपती’मध्ये दाखवलेल्या ‘त्या’ प्रयोगावर ‘अंनिस’चा आक्षेप!

“ हे चुकीचं होतं, असं जाहीर करावं”, असं मुक्ता दाभोळकर यांनी पत्रकारपरिषदेतून आवाहन देखील केलं आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आज नांदेड येथे पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये दाखवलेल्या एका प्रयोगाबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आपला आक्षेप असल्याचं सांगितलं. तसेच, हे चुकीचं होतं, असं जाहीर करावं, असं आवाहन देखील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकारणी सदस्य मुक्ता दाभोळकर यांनी केलेलं आहे.

मुक्ता दाभोळकर यांनी सांगितले की, “ ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये या कार्यक्रमामध्ये १५ किंवा १६ तारखेला दाखवण्यात आलेली अंधश्रद्धेवर आधारित एक क्लिप आमच्या निदर्शनास आली आहे. डोळे बंद करून वाचन करावे काळा चष्मा घालून वाचन करावे, अशा विविध प्रकारचे प्रयोग करून अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये झाला आहे. तरी या गोष्टीचा आम्ही निषेध करतो.” शिवाय, अशा कार्यक्रमावर बंदी घालण्यात यावी जेणेकरून अंधश्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना याचा फटका बसणार नाही, अशी देखील मागणी करत असल्याचे सांगितले.

पत्रकारपरिषदेत बोलताना मुक्त दाभोळकर म्हणाल्या की, “ मिड ब्रेन सबस्टिट्यूशन हा शब्द वापरला जातो. ज्यामध्ये दोन मेंदूंना जोडणार मेंदूचा भाग मध्य मेंदू हा विशिष्ट प्रकारे कार्यान्वित केला की माणसं डोळे बंद करून वाचू शकतात, असं म्हटलं जातं आणि डोळ्यांच्या ऐवजी स्पर्श आणि वासाचा वापर करून ही माणसं वाचतात, असं सांगितलं जातं. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात १५-१६ तारखेला अशाप्रकारचा एक प्रयोग करून दाखवण्यात आला. तर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं असं म्हणणं आहे आणि ते सत्य आहे की, असं डोळ्यांव्यतिरिक्त कुठल्याही इंद्रियांनी वाचता येत नाही. सेन्सरी सबस्टिट्यूशन वैगरे काहीही खरं नसतं. या माणसांना जर सांगितलं की तुम्ही डोक्याच्या मागच्या बाजूला धरून वाचा किंवा कानाजवळ धरून वाचा, जिथे तुम्हाला स्पर्शपण होईल आणि वास देखील येईल, तर ते हे आव्हान स्वीकारायला तयार होत नाहीत किंवा त्यांना सांगितलं की अंधार करून वाचा तर ते हे आव्हान स्वीकारत नाहीत. तसेच, त्यांना जर सांगितलं की डोळ्याला पोहण्याचा घट्ट बसणारा गॉगल लावून तो काळ्या रंगाने रंगवलेला असेल तर वाचा ते वाचायला तयार होत नाहीत. त्यामळे अंनिसने दिलेलं आव्हान स्वीकारायला यातील कुणीही तयार होत नाही. पालकांकडून पाच हजार रुपायांपासून २५ हजार रुपायांपर्यंत पैसे घेऊन हे मिडब्रेन अॅक्टिव्हेशन केलं जातं. त्यामुळे पत्रकारांच्या मार्फत प्रसार माध्यमांच्या मार्फत या फसवणुकीला वाचा फुटावी, पालकांनी यामध्ये फसू नये.”

तसेच, “ हे मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन कौन बनेगा करोडपतींमध्ये दाखवलंय, तर असे दिशाभूल करणारे कार्यक्रम त्यांनी दाखवू नयेत आणि हे चुकीचं होतं, असं जाहीर करावं असं आवाहन करण्यासाठी आजची पत्रकारपरिषद घेतली आहे.” असं देखील यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकारणी सदस्य मुक्ता दाभोळकर यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anniss objection to that experiment shown in kaun banega crorepati msr

Next Story
परळी वैद्यनाथ मंदिर RDX ने उडवण्याची धमकी; ५० लाखांच्या खंडणीची मागणी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी