मुंबई : संपूर्ण मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघत असताना भाजप महाजनादेश यात्रा काढून आगामी विधानसभा निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी फिरत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी टीका केली. मराठवाडय़ात तातडीने दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मराठवाडय़ातील शेतकरी भीषण दुष्काळाने होरपळून निघाले असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी हे सरकार मते मागण्यासाठी यात्रा काढते आहे. सरकारने मराठवाडय़ात महाजनादेश यात्रा नव्हे, तर दुष्काळी परिस्थितीचे आदेश काढावेत, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या एक हेक्टरपर्यंतच्या कर्जमाफीवर बोलताना चव्हाण म्हणाले की, अतिवृष्टी आणि महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण व  उत्तर महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने त्यांना भरीव मदत केलीच पाहिजे. मात्र, राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही त्या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या नवीन कर्जमाफीवर कितपत विश्वास ठेवावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला.

सततच्या दुष्काळी परिस्थतीमुळे मराठवाडय़ातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने यंदाही बहुतांश पेरण्या बुडाल्या आहेत.  पीक विम्याबाबतही शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. बहुतांश शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभच मिळालेला नाही. काही जणांना तुटपुंजी भरपाई मिळाली, तर त्यातूनही कर्जाची रक्कम वसूल करुन घेतली जात आहे असा आरोप केला.