हिंदूधर्मियांचा विरोध आणि चर्चेच्या गुऱ्हाळात १८ वर्षांपासून अडकलेले महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणारे विधेयक दोन दिवसांच्या वादळी चर्चेनंतर शुक्रवारी अखेर विधानसभेत बहुमताने संमत करण्यात आले. विरोधक तसेच वारकऱ्यांच्या सूचनेनुसार या विधेयकात काही सुधारणा करण्यात आल्या असून धार्मिक उत्सव, प्रदक्षिणा, पंढरपूरची वारी, मोहरम आदींना या कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. या कायद्यानुसार दोषी ठरलेल्यांना किमान ६ महिने तर कमाल ७ वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेला जनमताचा रेटा आणि या कायद्यात बदल करण्याबाबत सरकारने दाखवलेल्या तयारीनंतर विरोधकांचा या विधेयकास असलेला विरोध मावळला. त्यानुसार सरकारने बुधवारी हे विधेयक विधानसभेत सादर केले होते. त्यावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी ते संमत करण्यात आले. अंधश्रद्धेवर बंदी घालताना श्रद्धेवर घाला घालू नका. तसेच या कायद्यातील तरतुदीबाबत संदिग्धता असल्याने ती दूर करा, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली होती. तर हा कायदा ऐतिहासिक असून त्यामुळे सर्वसामान्य लोकांची भोंदूबाबांकडून होणारी फसवणूक टळेल, अशी भूमिका सत्ताधारी सदस्यांनी मांडली.
ही चर्चा सुरू असताना उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांना या विधेयकातील सुधारणा सुचवण्यास सांगितले. त्यावर, आपल्याला बोलू द्यावे अशी मागणी करत मंगलप्रभात लोढा, विनोद घोसाळकर यांच्यासह काही सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर धाव घेतली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत उपाध्यक्षांनी विधेयक मंजुरीला टाकताच सभागृहात गदारोळ सुरू झाला. या गदारोळातच विधेयकात काही सुधारणा सुचवण्यात आल्या. त्यानुसार, पीडित व्यक्ती अथवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने तक्रार केल्यासच गुन्हा दाखल होईल. मात्र मूळ विधेयकातील अन्य कोणत्याही व्यक्तीस असलेला तक्रार करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे.
कायद्यातून वगळलेल्या बाबी
* प्रदक्षिणा, यात्रा,  परिक्रमा, तसेच वारी.
* हरिपाठ, कीर्तन, प्रवचने, भजने, धार्मिक व पारंपरिक शास्त्रांचे तसेच प्राचीन विद्या व कलांचे शिक्षण व प्रसार.
* दिवंगत संतांच्या चमत्कारांचा प्रचार तसेच शारीरिक व आर्थिक हानी न करणाऱ्या धर्मगुरूंचा प्रचार.
* घर वा कोणत्याही धर्माच्या मंदिरातील अहानीकारक धार्मिक विधी.
* सर्व धार्मिक उत्सव, अंगात येणे, कडकलक्ष्मी, व्रतवैकल्ये, उपवास, नवस.
* वास्तुशास्त्रानुसार तसेच जोशी- ज्योतिषी, नंदीबैलवाले ज्योतिषी व इतर ज्योतिषांद्वारे दिला जाणार सल्ला, जमिनीखालचे पाणी सांगण्याबद्दल सल्ला देणे.
* मुलांचे कान व नाक टोचणे, जैनांचा केशलोचन विधी.
सर्व वगळण्यात आले आहे.
जादूटोणाविरोधी विधेयकाचा खडतर प्रवास..