तब्बल १५ सीसीटीव्ही कॅमेरे आणि रखवालदार अशी सुरक्षा व्यवस्था असतानाही प्रसिद्ध डीलक्स बेकरीचे व्यावसायिक जुनैद खान यांच्या घरावर मंगळवारी पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. सुमारे १०-१२ दरोडेखोरांनी वयोवृद्ध व्यक्तींनाही बेदम मारहाण करीत तब्बल ४० लाखांची रोकड व १५ तोळे सोने लुटले. पोलिसांनी मात्र १४ लाख २४ हजार रुपये व १५ तोळे सोने एवढी लूट झाल्याचे सांगितले. सहा महिन्यांपूर्वीही खान यांच्या घरात चोर घुसले होते. मात्र, त्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली नव्हती. त्यामुळे पाळत ठेवून पद्धतशीर रेकी करून हा दरोडा टाकण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
बेकरी उत्पादनातील अग्रेसर व्यावसायिक म्हणून जुनैद खान शहरात परिचित आहेत. त्यांची डीलक्स ऑल फ्रेश, डेलमार्क, एलसीन अशी बेकरी उत्पादने आहेत. शहरातील छावणी परिसरात होली क्रॉस शाळेजवळ त्यांचा मोठा बंगला आहे. बंगल्याच्या कुंपणाला काचा लावण्यात आल्या होत्या. या काचांचे थर बाजूला काढत दरोडेखोर आत शिरले. पाठीमागच्या दारातून ते आत घुसले. आतील दरवाजे फोडत त्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. दरवाजाच्या तुटलेल्या फळ्या, बॅट, हॉकीस्टीकसह शस्त्रेही त्यांच्याकडे होती.
घरामध्ये दरोडेखोर घुसल्याचे समजताच जुनैद खान यांची वृद्ध आई साहेबाजान हमीदखान (वय ८०) यांनी शेजारच्या खोलीत झोपलेल्या मुलास आवाज दिला. चोर आले, असे म्हणेपर्यंत दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या वेळी त्यांच्या अंगावरील सोने जबरदस्तीने काढून घेतले व जबर मारहाण केली. तोपर्यंत अन्य साथीदारांनी घरातील कपाटातून व्यवसायातून एकत्रित झालेली रक्कम काढून घेतली.
हे दृश्य पाहताच जुनैद खान यांनी दरोडेखोरांना विरोध केला. दरोडेखोर हिंदी आणि मराठी भाषेत बोलत होते. दरोडा पडला तेव्हा घरात खान पती-पत्नी, आई व दोन मुले होती. लूट सुरू असताना यातील काही दरोडेखोरांना जुनैद यांनी विरोध केला. तेव्हा त्यांच्या डोक्यात दाराच्या लाकडी फळीने जोरदार वार करण्यात आला. सर्व दरोडेखोरांचे चेहरे झाकले होते. एकाचा चेहऱ्यावरचे कापड काढून त्यांनी चेहरा पाहिल्याचेही सांगितले. मात्र, त्यांना झालेली मारहाण एवढी जबर होती, की ते नंतर बेशुद्धच पडले. त्यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिनेही दरोडेखोरांनी काढून घेतले. या बरोबरच शेजारी झोपलेल्या मुलांना ‘झोप, अन्यथा मारू’ अशी धमकी दिल्याचे जुनैद यांच्या मुलाने पोलीस आयुक्तांना सांगितले.
बंगल्याच्या भोवती मोठे पटांगण असल्याने बाहेरच्या बाजूलाही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्यातील काही कॅमेऱ्यांचे तोंड चोरटय़ांनी वरच्या बाजूला केले. बाकी कॅमेऱ्यांच्या वायर तोडल्या व चलचित्र संकलन यंत्रही निकामी केले. दरोडा एवढा पद्धतशीर टाकला गेला असल्याने बंगल्याची रेकी करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. दरोडय़ाच्या तपासासाठी सकाळी श्वानपथक पाठविले. मात्र, मुख्य रस्त्यापर्यंतच ते गेले. तेथून दरोडेखोर गाडीने गेले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. एका बाजूला शहरात वाहन जाळण्याचे प्रकार दररोज घडत असतानाच या दरोडय़ामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्य़ाचा तपास करणे हे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.