मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर बुधवारी दुपारी कला महाविद्यालयातील प्राध्यापकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. कला महाविद्यालय प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याने प्राध्यापकाने हे पाऊल उचलले असून संबंधित प्राध्यापकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारत गीते असे या प्राध्यापकाचे नाव आहे.

भारत गीते हे वांद्रे येथील ‘एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ‘माझे कला महाविद्यालय वाचवण्यासाठी मी गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत आहे. पण आंबेकर या प्राचार्या झाल्यापासून त्यांनी महाविद्यालय बंद करण्याच्या नादात प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. मात्र, मी याविरोधात लढा दिल्याने माझा देखील छळ करण्यात आला. यापूर्वी माझ्या गुरुलाही त्रास देऊन कामावरुन तडकाफडकी काढून टाकण्यात आले. आता मला देखील टार्गेट करण्यात येत आहे’, असे गीते यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘राज ठाकरे ही माझी सर्वात आवडती व्यक्ती असून त्यांच्या घरासमोर आत्महत्या करत आहे’, असे गीते यांनी या पत्रात म्हटले आहे. माझ्या पश्चात माझ्या सहकारी प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी कॉलेज वाचवण्याचे प्रयत्न सुरु ठेवावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.  राज ठाकरे हे कलाप्रेमी असून त्यांनी हे महाविद्यालय वाचवण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी यात म्हटले आहे.

गीते यांनी दुपारी बाराच्या सुमारास राज ठाकरे यांच्या निवासस्थानााबाहेर विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.  निवासस्थानाबाहेर तैनात असलेल्या पोलिसांनी तातडीने संबंधित प्राध्यापकाला रुग्णालयात दाखल केले आहे. प्राध्यापकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.