सुशीलकुमार शिंदे / प्रसाद हावळे

लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील पाच टप्पे पूर्ण झाले. राज्यात तब्बल महिनाभर चाललेली ही निवडणूक प्रत्येक टप्प्यागणिक बदलत गेली, अधिक चुरशीची आणि रंगतदार बनली. या संपूर्ण काळात पुणेस्थित ‘द स्ट्रेलेमा’ या निवडणूक रणनीती क्षेत्रात कार्यरत संस्थेने राज्यभर केलेले सर्वेक्षण या निवडणुकीचे विविध कंगोरे उलगडून दाखवणारे आहे. ‘द स्ट्रेलेमा’ने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा घेतलेला हा अनुभवनिष्ठ धांडोळा आजपासून विभागवार प्रसिद्ध करत आहोत…

Lok Sabha election voter BJP Mohite Patil politics
मतप्रवाहाचा मागोवा: माढ्यात मोहितेंच्या प्रतिष्ठेची लढाई
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
abhijt panse mns candidate
भारतीय जनता पक्षाच्या जागेवर मनसेने केला उमेदवार जाहीर, आता भाजपाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!
bjp leader Gopichand padalkar
जत विधानसभेसाठी पडळकरांच्या उमेदवारीस अप्रत्यक्ष विरोध
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
chhagan bhujbal narendra modi
भाजपाच्या ‘४०० पार’च्या घोषणेचा निवडणुकीत फटका बसला? भुजबळांची जाहीर कबुली; मोदींचा उल्लेख करत म्हणाले…
shinde group leader Anandrao Adsul
“अमरावतीमधून निवडणूक लढवू नका, अमित शांहाचा फोन आणि…”, आनंदराव अडसूळांना बदल्यात काय मिळालं?
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य

पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांमध्ये विभागलेल्या विदर्भात एकूण १० लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यातील पूर्व भागात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, वर्धा हे सहा मतदारसंघ येतात. यावेळी पहिल्या दोन टप्प्यांत या सहाही मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडली. एकेकाळी काँग्रेसचा वरचष्मा असलेल्या विदर्भात २०१९ च्या निवडणुकीत या सहापैकी पाच जागांवर महायुतीचे उमेदवार (भाजप ४ आणि शिवसेना १) विजयी झाले होते. या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भात याहीवेळी महायुती, प्रामुख्याने भाजप आपले वर्चस्व कायम राखणार की तिथे काँग्रेस आणि मित्रपक्षांचा पुर्नउदय होणार, याबद्दल विदर्भाप्रमाणेच राज्यातही औत्सुक्य दिसते. हे औत्सुक्य घेऊनच पूर्व विदर्भातील या सहाही मतदारसंघांची सफर केली असता, काय दिसले?

सुरुवात पूर्व विदर्भातून करू. नागपूर हा येथील भाजपचा गड. गेली दहा वर्षे नितीन गडकरी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावेळी त्यांच्याविरोधात काँग्रेसने पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवले. अंतर्गत गटबाजी असूनही ठाकरे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस स्थानिक पातळीवर सूक्ष्म नियोजन करत सक्रिय दिसली. कुणबी, हलबा, दलित आणि मुस्लीम समाजाची मते या मतदारसंघात निर्णायक ठरतात. येथील हलबा आणि कुणबी मतदार गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये नितीन गडकरी यांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसला. यावेळी काँग्रेसकडून येथे कुणबी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु विकास ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ वगळता, अन्यत्र कुणबी मतदाराला आपल्याकडे वळवण्यात काँग्रेसला फारसे यश आलेले दिसत नाही. सुरुवातीला हलबा समाजाची भाजपबाबत नाराजी दिसली. पण नितीन गडकरी यांनी प्रचारादरम्यान हलबा समाजाला भावनिक साद घातल्याचे सकारात्मक प्रतिसाद दिसून आले. तसेच दलित आणि मुस्लीम समाजाची मते आपल्याकडे वळवण्यात येथे काँग्रेसला यश आलेले दिसत असले, तरी गडकरींना येथे पक्षीय लढतीपेक्षा स्वप्रतिमा आणि विकासकामांवर ही निवडणूक वळवण्यात यश मिळाल्याचे दिसले.

हेही वाचा >>>जत विधानसभेसाठी पडळकरांच्या उमेदवारीस अप्रत्यक्ष विरोध

तर शेजारी रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर होताना बऱ्याच उलथापालथी झाल्या. काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेल्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने ऐनवेळी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. या मतदारसंघात श्यामकुमार बर्वे यांची फारशी ओळख नसली, तरी रश्मी बर्वे यांच्याविषयी मतदारसंघात निर्माण झालेल्या सहानुभूतीचा काही प्रमाणात येथे काँग्रेसला फायदा झाला. तर शिवसेनेने (शिंदे गट) विद्यामान खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी देण्याऐवजी उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली. यामुळे कृपाल तुमाने यांच्याबरोबरच शिवसेनेकडून आणखी एक इच्छुक वर्धराज पिल्ले यांचीही नाराजी प्रचारादरम्यान दिसून आली. त्यात काँग्रेसकडून माजी मंत्री सुनील केदार यांनी गावनिहाय बैठका घेत नियोजनबद्ध प्रचार सुरू केल्याने काँग्रेसने वातावरणनिर्मिती केली होती. तसेच मागील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले किशोर गजभिये यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवली. याचा फटका काँग्रेसला कामठी या विधानसभा मतदारसंघात बसून तिथे दलित मतांचे निर्णायक विभाजन होण्याची शक्यता दिसते. मात्र, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सभांचा फायदा राजू पारवे यांना मिळेल, असे चित्र आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देऊन भाजपने माजी खासदार हंसराज अहीर यांची नाराजी ओढावून घेतली. तर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे कन्या शिवानी यांच्या उमेदवारीसाठी इच्छुक असतानाही काँग्रेसने माजी खासदार दिवंगत सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीवरून झालेली सुंदोपसुंदी आणि मतदारसंघातील कुणबी समाजकेंद्री जातीय समीकरण यांचा प्रभावी वापर प्रतिभा धानोरकर यांनी प्रचारात केलेला दिसून आला. मतदारसंघात त्यांच्याविषयी निर्माण झालेली सहानुभूती, तसेच ‘कुणब्याची लेक’ म्हणवून घेत केलेला आक्रमक प्रचार यामुळे प्रतिभा धानोरकर यांना वणी, आर्णी आणि वरोरा येथील मतदारांना काँग्रेसकडे वळवण्यात यश आल्याचे दिसते. पंतप्रधान मोदींची सभा, तसेच चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे महायुतीला समर्थन दिल्याने सुधीर मुनगंटीवार यांना बळ मिळाले असले, तरी त्यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि दलित व मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे वळल्याने मुनगंटीवार यांना येथे फटका बसण्याची शक्यता आहे.

शेजारी गडचिरोली-चिमूर या आदिवासीबहुल मतदारसंघात निवडणूक स्थानिक मुद्द्यांनी प्रभावित झालेली दिसली. येथे विद्यामान खासदार अशोक नेते यांच्याविषयी मतदारांमध्ये नाराजी दिसत असतानाही भाजपने याहीवेळी त्यांनाच उमेदवारी दिली. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघातील अहेरी तालुक्यातील सूरजागड लोहप्रकल्प आणि आरमोरी तालुक्यातील कोसरी लघुसिंचन प्रकल्प यांना स्थानिक आदिवासींचा विरोध आहे. मात्र, या प्रकल्पांचा आग्रह धरल्याने भाजपविषयी स्थानिकांमध्ये नाराजी दिसून आली. शिवाय अशोक नेते हे त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात विकासकामे करण्यात अपयशी ठरल्याचे, तसेच त्यांनी पुरेसा जनसंपर्कही राखला नसल्याची भावना मतदारांमध्ये होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केला असला, तरी त्यांच्याशी बांधील मतदार मात्र संभ्रमात दिसून आला. याउलट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नामदेव किरसान यांच्या प्रचार नियोजनाची धुरा हाती घेऊन प्रभावी रणनीती आखल्याचा फायदा येथे काँग्रेसला होताना दिसला.

पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया या मतदारसंघामध्ये भाजपने विद्यामान खासदार सुनील मेंढे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. तर येथे त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून प्रशांत पडोळे हे उमेदवार होते. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मतदारसंघात वैयक्तिक लक्ष घातल्याने येथे चुरस निर्माण झाली. तर महायुतीकडून माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे विशेष सक्रिय दिसले. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारांपेक्षा येथील लढत ‘पटोले विरुद्ध पटेल’ अशीच झाली. मात्र, मतदारसंघातील ग्रामीण भागात भाजपविषयी, विशेषत: सुनील मेंढे यांच्याविषयी बरीच नाराजी दिसून आली. त्यातच कुणबी आणि पोवार समाजाच्या मतांमध्ये झालेल्या विभाजनाचा येथे भाजपला फटका बसू शकतो. भाजपला रामराम करून बसपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवत असलेल्या संजय कुंभलकर यांच्यामुळे भंडारा जिल्ह्यात काँग्रेससह भाजपचेही नुकसान होऊ शकते. मात्र, तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांचे चिरंजीव रविकांत बोपचे यांच्या प्रभावी प्रचाराचा येथे काँग्रेसला लाभ होऊ शकतो. तसेच तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांनीही ऐनवेळी महाविकास आघाडीच्या बाजूने भूमिका घेतल्याने येथे काँग्रेसला बळ मिळाल्याचे दिसले. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार गट) एकमेव जागा वर्धा मतदारसंघात लढवली. त्यांच्याकडून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली. येथे भाजपकडून विद्यामान खासदार रामदास तडस यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात कुणबी आणि तेली समाजाची मते निर्णायक ठरतात. प्रचारादरम्यान मतदारसंघात कुणबी विरुद्ध तेली असे ध्रुवीकरण झाल्याचेही पाहायला मिळाले. कुणबी समाजातील भाजप नेत्यांना (दत्ता मेघे, पंकज भोयर, प्रताप अडसड) त्यांच्या प्रभावाखालील कुणबी मतदार भाजपकडे वळवण्यात किती यश मिळते, त्यावर येथील निकाल अवलंबून असेल.

पूर्व विदर्भात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली. राष्ट्रीय मुद्द्यांची चर्चा इथे जितकी झाली, तितकीच स्थानिक मुद्द्यांचीही झाली. पक्षीय लढतींपेक्षा उमेदवारांमधील लढतींनाही येथे महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे येथील चित्र उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळे ठरते का, यावर पूर्व विदर्भाची निवडणुकीय अपूर्वाई ठरणार आहे.

(सुशीलकुमार शिंदे हे ‘द स्ट्रेलेमा’चे संस्थापक संचालक आहेत, तर प्रसाद हावळे हे ‘इंडियन सेंटर फॉर पॉलिसी अँड लीडरशिप डेव्हलपमेंट’चे संचालक आहेत.)

sushil@strelema. com

prasadhavale@icpld. Org