नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याने ७ डिसेंबरला एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता राजकीय वातावरण तापू लागले आहे. विधान परिषद किंवा राज्यसभा निवडणुकीत मतांचा पसंतिक्रम निश्चित केलेला असतो. पोटनिवडणुकीत मात्र मतांचा कोटा निश्चित नसतो. सर्व २८८ मतांमधून सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार विजयी घोषित केला जातो. विधान परिषदेच्या एकापेक्षा जास्त जागांसाठी पोटनिवडणूक होत असली तरी प्रत्येक जागा वेगळी मानली जाते. म्हणजेच तीन जागांकरिता पोटनिवडणूक असल्यास प्रत्येक जागेकरिता मतांचा पसंतिक्रम किंवा कोटा नसतो. सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार निवडून आल्याचे जाहीर करण्यात येते.
एका जागेसाठी मतदान कसे होते?
एका जागेसाठी पोटनिवडणूक असल्यास सर्व २८८ सदस्यांमधून एका उमेदवाराची निवड केली जाते. द्वैवार्षिक निवडणुकीत पसंतिक्रमानुसार मते देता येतात. म्हणजेच १० जागांसाठी निवडणूक असल्यास सदस्यांना १० पसंतिक्रमाने मते देता येतात. पोटनिवडणुकीत मतांचा कोटा नसतो. सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार निवडून येतो. सर्व २८८ सदस्यांनी मतदानात भाग घेतल्यास १४५ मते मिळविणारा विजयी होतो.
द्वैवार्षिक निवडणुकीत मते कशी मोजली जातात?
एकापेक्षा जास्त जागांसाठी निवडणूक असल्यास पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा निश्चित केला जातो. म्हणजेच कोटय़ापेक्षा जास्त मते मिळालेला निवडून येतो. त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास अन्य उमेदवारांची दुसऱ्या, तिसऱ्या अशा पद्धतीने मतांची मोजणी केली जाते. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पार केलेल्या उमेदवाराला मिळालेल्या अतिरिक्त मतांचे मूल्य निश्चित केले जाते. त्यानुसार मतांची विभागणी केली जाते. ही पद्धत किचकट असते. अलीकडेच गुजरातमध्ये राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे अहमद पटेल यांना निसटता विजय मिळाला होता. १९९८ मध्ये राज्यातील राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे सतीश प्रधान यांनी माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांचा अध्र्या मताने पराभव केला होता. तसेच १९९६ मध्ये विधान परिषद निवडणुकीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख एकापेक्षा कमी मूल्य असलेल्या मताने पराभूत झाले होते.