शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेवर शिक्कामोर्तब झाले. राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना ट्विटवरुन अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. मात्र एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना धर्मनिरपेक्षतेवरुन टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच गुरुवारी पहिली मंत्रीमंडळ बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांना एका पत्रकाराने “किमान समान कार्यक्रमात धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख करण्यात आला असून शिवसेना आता धर्मनिरपेक्ष झाली आहे का?,” अशी विचारणा केली. या प्रश्नावरुनच उद्धव आणि पत्रकारामध्ये खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं. पत्रकारच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी, “धर्मनिरपेक्ष म्हणजे काय हे तुम्हीच सांगा” असा उलट सवाल पत्रकाराला केला. यावर पत्रकाराने “मी प्रश्न तुम्हाला विचारला असून तुम्ही उत्तर द्या,” असं म्हटलं. त्यावर उद्धव यांनी “मी सांगणार नाही, तुम्हीच सांगा” म्हणत प्रश्नाचे उत्तर देणं टाळलं. याचवरुन ओवेसींनी उद्धव यांना ट्विट करुन सल्ला दिला आहे.

“धर्मनिरपेक्ष म्हणजे काय हा काही तात्त्विक प्रश्न नाही ज्यासाठी सखोल चिंतनाची आवश्यकता आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या किमान समान कार्यक्रमामधील शब्दांचे अर्थ इतरांना विचारावे लागत आहे हे फार वाईट आहे. असो हे घ्या थोडे ज्ञान. धर्मनिरपेक्ष म्हणजे… १) हिंदुराष्ट्र नसणे… २) श्रद्धेमध्ये भेदभाव न करणे. काही समजलं का?” असं ट्विट ओवेसींनी केलं आहे.

ओवेसीच नाही तर भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि खासदार पूनम महाजन यांनी उद्धव यांना शुभेच्छा देताना टोला लगावला. “तीन चाकाची ही गाडी कुठवर चालते ते पाहू. फक्त शरद पवार ही अनैसर्गिक आघाडी एकत्र ठेऊ शकतात. काँग्रेसकडे सांगण्यासारखे फारसे काही नाही. ते फक्त दिल्लीमधून हे सर्व पाहत आहेत,” असं पूनम म्हणाल्या.