नागपूर येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मेळाव्यात राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी जे उद्गार काढले व महिलांना जो सल्ला दिला तो प्रेमापोटी दिला आहे. स्त्रियांनी समाजात वावरताना कसे वागावे, याचा त्यांनी मोलाचा पाठ दिला. त्यामुळे त्यांचे वक्तव्य अगदी योग्यच आहे, असे मत हिंदूसेना प्रमुख चंद्रशेखर गाडगीळ यांनी व्यक्त केले.
‘स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला स्त्रियांचे राहणे, वेषभूषा, केशभूषा या बाबीही २५ टक्के जबाबदार आहेत. स्त्रियाच नीट पेहराव करीत नसल्याने होणाऱ्या अत्याचारांना त्याच बऱ्याच प्रमाणात जबाबदार आहेत. स्त्रियांनी आपल्या पेहराव व वागणुकीत बदल करावा, ही बाब व सूचना अत्यंत योग्य आहे.
डॉ.आशा मिरगे यांनी नागपूरच्या त्या मेळाव्यात असे वक्तव्य केले असेल तर त्यांचे काहीच चुकले नाही. त्यांच्या त्या वक्तव्यास आमचे पूर्ण समर्थन आहे,’ असेही ते म्हणाले.
खरे तर डॉ. मिरगे काही वावगे बोलल्या नाहीत तरी लोकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांना माफी मागण्यास भाग पाडले, ही सुद्धा योग्य बाब नाही. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी लोकशाहीतील त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केले आहे अशी टीका त्यांनी केली.