पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी मान मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मान मिळाला. गेल्या २० वर्षांपासून ते वारी करत आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यास राज्य निवडणूक आयोगाने काही अटी व शर्तींवर संमती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होण्याचा मार्ग मोकळा झाला. शनिवारी रात्री उशिरा पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर पहाटे ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी उपस्थित होते. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी पावणेबारा वाजता मुख्यमंत्री पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच दुपारी साडेबारा वाजता ते पक्ष मेळाव्यास उपस्थित राहतील.