लोकसभा लढण्याचा काँग्रेस पक्षाध्यक्षांचा आदेश; राजीव सातव मात्र रिंगणाबाहेर

राज्याच्या राजकारणात परतण्याचे वेध लागल्यानेच नांदेडमध्ये पत्नीचे नाव लोकसभेसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढे केले होते, पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा प्रस्ताव फेटाळून अशोकरावांनाच लोकसभा लढण्यास सांगितले आहे. पक्षाचे दुसरे खासदार राजीव सातव हे गुजरातमधील जबाबदारीमुळे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर पडले आहेत. रत्नागिरीचा उमेदवार बदलला जाणार नसला तरी चंद्रपूरवरून झालेल्या वादामुळे पक्षात फेरविचार सुरू झाला आहे.

काँग्रेसने राज्यातील आणखी पाच उमेदवारांच्या नावांची शुक्रवारी मध्यरात्री घोषणा केली. यात विनायक बांगडे (चंद्रपूर), विलास औताडे (जालना), सुभाष झांबड (औरंगाबाद), सुरेश टावरे (भिवंडी) आणि मच्छिंद्र कामत (लातूर) यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या वाटय़ाला आलेल्या २४ मतदारसंघांपैकी १७ मतदारसंघांतील उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या दोन मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांवरून वाद झाले आहेत. सनातन संस्थेशी संबंध असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीबाबत फेरविचार करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिले होते. पण बांदिवडेकर यांची उमेदवारी कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चंद्रपूरमधील बांगडे यांच्या उमेदवारीवरून स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. चंद्रपूरच्या उमेदवारीबाबत दिल्लीत कळविण्यात आले असून, पक्षाकडून योग्य निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

राज्याच्या राजकारणात परतायचे असल्यानेच नांदेडमध्ये पत्नी अमिता यांना उमेदवारी देऊन स्वत: विधानसभा निवडणूक लढण्याची अशोक चव्हाण यांची इच्छा होती. नांदेड जिल्हा काँग्रेस समितीने तसा ठराव केला होता. राज्य काँग्रेसनेही अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली होती. पण काँग्रेससाठी प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने  अशोकरावांनाच लोकसभा लढण्यास सांगण्यात आले आहे. ‘पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढेन’ असे सांगत अशोकरावांनी लोकसभा लढण्याचे सुतोवाच केले.

हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव हे पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून लोकसभा लढण्याबाबत फार उत्सुक नव्हते. त्यातच त्यांच्याकडे मोदी-शहा यांच्या गुजरात राज्याची काँग्रेसची जबाबदारी असल्याने त्यांना निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहण्यास पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे काँग्रेसच्या विद्यमान दोनपैकी एकच खासदार पुन्हा रिंगणात असेल.

चंद्रपूरच्या उमेदवारीवरून गोंधळ

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने विनायक बांगडे यांची उमेदवारी जाहीर करताच पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली. या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘माझे कोणी ऐकण्यास तयार नाही. मी सुद्धा राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत आहे‘ अशी हतबलता एका कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या संभाषणाची ध्वनिफीत समाज माध्यमांतून सार्वजनिक झाली. माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव होता. मात्र  मुत्तेमवार यांनी माघार घेतली. शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसच्या उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते. नागपूर व यवतमाळ मध्ये कुणबी समाजाचा उमेदवार दिल्याने चंद्रपुरात तेली समाजाचा उमेदवार हवा असा आग्रह मुकूल वासनिक यांनी धरला व प्रदेश प्रभारी मल्लीकार्जून खरगे यांनाही हे  समीकरण पटवून दिले. सरचिटणीस मुकूल वासनिक यांचे समर्थक तेली समाजाचे विनायक बांगडे यांचे नाव निश्चित झाले.

चंद्रपूरचा या वादाला वेगळेच वळण लागले ते समाज माध्यमांवर सार्वजनिक झालेल्या अशोक चव्हाण यांच्या ध्वनिफीतीमुळे. राजूरकर नावाच्या कार्यकर्त्यांने प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना फोन करून धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला असता, त्यांनी आपले पक्षात कुणी ऐकत नाही, त्यामुळे आपणच प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या मानसिकतेत असल्याचे म्हटले होते. चव्हाण यांचा सारा रोख हा मुकूल वासनिक यांच्यावर होता हे स्पष्टच आहे.  अशोक चव्हाण यांनी मात्र मुंबईत पत्रकार परिषदेत राजीनामा देण्याच्या वृत्ताचा इन्कार केला.

वासनिक यांच्या उमेदवारीचा घोळ

काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मुकूल वासनिक हे रामटेक मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राज्य काँग्रेसने त्यांच्या एकाच नावाची शिफारस केली होती. पण सावनेरचे आमदार सुनील केदार यांनी वासनिक यांच्या उमेदवारीस ठाम विरोध केला. पक्षांतर्गत विरोध लक्षात घेऊनच दिल्लीने अद्याप निर्णय घेतला नव्हता.